कराची: पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या हातून सत्ता गेल्यापासून ते पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) चे अध्यक्ष आणि देशाचे नवीन वझीर-ए-आझम शाहबाज शरीफ यांच्या सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. आता परत एकदा इम्रान खान यांनी सरकारवर केलेल्या टीकेची जोरदार चर्चा सुरू आहे. "अशा चोरांच्या हाती सत्ता देण्यापेक्षा कुणीतरी देशावर अणुबॉम्ब (Nuclear Bomb) टाकला असता तर बरं झालं असतं," असं वक्तव्य इम्रान खान यांनी केलं आहे.
सत्ता गेल्याचे दुःख कायम पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे हे अजब विधान सध्या व्हायरल होत आहे. द न्यूज इंटरनॅशनलच्या वृत्तानुसार, इम्रान खान म्हणाले की, "चोरांच्या हाती सत्ता सोपवण्यापेक्षा देशावर कुणी अणुबॉम्ब टाकला असता तर बरं झालं असतं. देशावर चोरांचे सरकार लादल्याने मला धक्का बसला आहे. सत्तेवर आलेल्या चोरांनी प्रत्येक संस्था आणि न्यायव्यवस्था उद्ध्वस्त केली, आता या गुन्हेगारांच्या प्रकरणांची चौकशी कोणता सरकारी अधिकारी करणार?" असा सवाल त्यांनी यावेळी केला.
पाकिस्तानी पंतप्रधानांचे उत्तरइम्रान खानच्या या वक्तव्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, "इम्रान खान आपल्या भाषणांनी सरकारी संस्थांना लक्ष्य करून पाकिस्तानी जनतेच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत." दरम्यान, इस्लामाबादमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर संसदेच्या पहिल्या अधिवेशनात शाहबाज शरीफ म्हणाले होते की, "ते (इमरान खान) नवीन सरकार आणि जनतेला वारंवार चोर आणि डाकू म्हणत असल्यामुळे देश दोन गटात विभाजित झाला आहे."
माझ्या जीवाला धोका- इम्रान खानकाल दुपारी सियालकोटमध्ये झालेल्या रॅलीत इम्रान खान यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा पुनरुच्चार केला आहे. ते म्हणाले, ''माझ्या हत्येच्या कटाचा एक व्हिडिओ माझ्याकडे आहे, ज्यामध्ये त्या सर्व लोकांची नावे आहेत जे त्यांचे सरकार हटवण्याच्या कटात सामील होत. मला काही झाले तर त्यांनी सुरक्षित ठिकाणी ठेवलेला व्हिडिओ सार्वजनिक केला जाईल."