पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही. तोशाखाना प्रकरणात दोषी आढळल्यानंतर इम्रान खानला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्यावर पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यासही बंदी घालण्यात आली आहे. अशा स्थितीत त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे. तसेच, आता पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ECP) इम्रान खान यांना आपला पक्ष 'पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ' (PTI) च्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) सिकंदर सुल्तान राजा यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने इम्रान खान यांच्या अटकेनंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर असा निर्णय घेण्यात आला की, दोषी आढळल्यानंतर इम्रान खान हे 'पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ' चे प्रमुखपद स्वीकारण्यास पात्र नाहीत, त्यामुळे निवडणूक आयोगाला आता त्यांना पदावरून बडतर्फ करण्याचा आदेश जारी करावा लागणार आहे. वृत्तानुसार, निवडणूक आयोगाच्या राजकीय वित्त शाखेला फाइल तयार करायची आहे आणि काही वेळानंतर अधिसूचना जारी केली जाईल.
शिक्षा जाहीर होताच इम्रान खान यांना अटक!इम्रान खान हे शनिवारी तोशाखाना प्रकरणात दोषी आढळले आणि त्यानंतर त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा जाहीर झाल्यानंतर त्यांना तात्काळ अटक करून अट्टक कारागृहात पाठवण्यात आले. तसेच, या प्रकरणात इम्रान खान यांना एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश हुमायून दिलावर यांनी इम्रान खान यांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरवले आहे. त्यामुळे इम्रान खान लवकरच होणाऱ्या सार्वजनिक निवडणुकीत भाग घेऊ शकणार नाहीत.