इस्लामाबाद :पाकिस्तानला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा देशाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा मोठा धोका आहे, असे पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, तुम्ही तुमच्या विदेशी शत्रूंना ओळखता. परंतु, पाकचे लोक आजही त्या शत्रूला ओळखू शकलेले नाहीत जो इथेच जन्मलेला आहे.
इम्रान खान आमच्यात आहेत व ते पाकसाठी पंतप्रधान मोदींहून अधिक धोकादायक आहेत. परंतु, हे लोकांना दिसत नाही. आसिफ यांनी वृत्त निवेदकालाच विचारले की कोण जास्त धोकादायक आहे? जो आपल्यात आहे तो की सीमेपलीकडे आपल्यासमोर उभा आहे तो? इम्रान यांच्या अटकेनंतर ९ मे रोजी देशात जी दंगल उसळली होती ती बंडखोरी होती व इम्रान खान हे सर्वांत मोठे बंडखोर आहेत. ते आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी मोठा धोका आहेत व ९ मे हा त्याचा सर्वांत मोठा पुरावा आहे, असे ते म्हणाले.
पाक लष्कराकडून वर्णन काळ्या दिवसाचे
इम्रान खान यांना दहशतवादविरोधी प्रकरणात १३ जूनपर्यंत जामीन मिळाला आहे. इम्रान खान यांना ९ मे रोजी अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक करण्यात आली होती. त्यांना पाक रेंजर्सच्या पथकाने अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी देशभरात निदर्शने केली होती. पाकिस्तानी लष्कराने या दिवसाचे वर्णन देशाच्या इतिहासातील ‘काळा दिवस’ म्हणून केले होते.