Imran Khan News: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची अटक बेकायदेशीर ठरवली असून, त्यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश सरन्यायाधीशांनी दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांना शुक्रवारी (12 मे) इस्लामाबाद उच्च न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. यासोबतच त्यांना उच्च न्यायालयाचा निर्णय स्वीकारावा लागेल, असेही सांगितले आहे.
मला लाठ्यांनी मारहाण केलीसुटका झाल्यानंतर इम्रान खान यांनी आपल्याला लाठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला. इम्रान सरन्यायाधीशांना म्हणाले की, मला अजूनही कळत नाही की माझ्यासोबत असे का झाले..? कोर्टरुममधून माझे अपहरण करण्यात आले. मी वॉरंट मागितले, पण मला वॉरंट दाखवले गेले नाही. मला गुन्हेगारासारखे वागवले गेले. मला मारहाण झाली. आम्हाला निवडणुका हव्या आहेत, आम्ही राडा का करू? त्यावर सरन्यायाधीशांनी राजकारणावर बोलू नका, असे त्यांना सांगितले.
इम्रान खान यांच्या अटकेनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी एनएबीला फटकारले. सुनावणीदरम्यान तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने एनएबीने न्यायालयाचा अवमान केल्याचे मान्य केले. सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांनी इम्रान खान यांना न्यायालयाच्या आवारातून अटक करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने (SC) गुरुवारी नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोला (NAB) पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांना तासाभरात न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले. न्यायालयात हजर राहिल्यानंतर सरन्यायाधीशांनी पीटीआय प्रमुखांच्या सुटकेचे आदेश जारी केले.
न्यायालयाने फटकारलेसरन्यायाधीश उमर अता बंदियाल म्हणाले की, न्यायालय या प्रकरणावर खूप गंभीर आहे. या प्रकरणी न्यायालय आजच योग्य तो आदेश जारी करणार आहे. एखाद्या व्यक्तीला न्यायालयाच्या परिसरातून कसे अटक केली जाऊ शकते. न्यायालयाची स्वतःची प्रतिष्ठा आहे. इम्रान खान यांच्या अटकेनंतर न्यायालयात कोणालाही सुरक्षित वाटणार नाही. न्यायालयाच्या आवारात अटक करणे ही एक धोकादायक प्रवृत्ती आहे, हे थांबवले पाहिजे, असे म्हटले.