पाकिस्तानी लष्कराने दोन दिवसांत राजीनामा देण्याची मागणी धुडकावून लावत आर या पारची लढाई लढणार असल्याची घोषणा करणाऱ्या इम्रान खान यांना काही दिवसांचा दिलासा मिळाला आहे. खासदाराचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर आज दाखल होणारा अविश्वास ठराव तीन दिवस पुढे गेला आहे. यामुळे यावरील मतदानाची तारीखही पुढे जाणार आहे.
पाकिस्तानी संसदेचे अध्यक्ष असद कैसर यांनी अविश्वास प्रस्ताव सादर करण्याची तारीख २८ मार्च केली आहे. यामुळे त्यावरील मतदान पुढील आठवड्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. हे मतदान २८ मार्चला होणार होते.
बहुमत सिद्ध करण्यापूर्वी सहकारी पक्षांचे मन वळवण्याचे इम्रानचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. आता नॅशनल असेंब्लीमध्ये पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचा मित्रपक्ष असलेल्या मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंट-पाकिस्तान (MQM-P) नेही विरोधकांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यासाठी विरोधी पक्षांच्या युतीला सहकार्य करणार असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.
याच्या बदल्यात इम्रान सरकार पडल्यानंतर एमक्यूएम-पीने स्वतःसाठी मंत्रीपदे मागितली आहेत. याशिवाय कराची आणि हैदराबादमध्येही पाय रोवण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन मिळविले आहे. मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंट-पाकिस्तान हा सध्या सत्ताधारी पीटीआयचा सर्वात मोठा सहयोगी आहे. नॅशनल असेंब्लीत त्यांचे सात खासदार आहेत.