ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 21 - पीटीव्हीच्या मुख्यालयावर 2014 साली झालेल्या हल्ल्याप्रकरणी इस्लामाबाद येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इमरान खान आणि पाकिस्तान अवामी तेहरिक पक्षाचे प्रमुख ताहिरुल कादरी यांना अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. तसेच इमरान खान आणि ताहिरुल कादरीसह अन्य 68 जणांना 17 नोव्हेंबरपर्यंत अटक करुन कोर्टासमोर हजर करण्यासही कोर्टाने सांगितले आहे.
'डॉन' वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, पीटीव्ही मुख्यालयावरील हल्ल्याप्रकरणी शुक्रवारी झालेल्या सुनावणीत, 'इमरान खान आणि ताहिरुल कादरी यांच्याविरोधात जारी करण्यात आलेल्या अटक वॉरंटच्या अंमलबजावणीबाबतचा अहवाल पोलीस सादर का करु शकले नाही', असा प्रश्न उपस्थित करत न्यायालयाने पोलिसांच्या अपयशावर ताशेरे ओढले आहेत.
1 सप्टेंबर 2014 रोजी पाकिस्तान तेहरिक ए इंसाफ आणि पाकिस्तानी अवामी तेहरिकच्या कार्यकर्त्यांनी पीटीव्हीच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन केले होते. यावेळी आंदोलकांनी चॅनेलच्या मुख्यालयावर हल्ला करून पीटीव्ही न्यूज आणि पीटीव्ही वर्ल्ड या वाहिन्यांचे प्रसारण बंद पाडले होते. या प्रकरणी 70 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.