Imran Khan Pakistan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. 9 मे रोजी इम्रान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक केल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठा हिंसाचार झाला. इम्रान यांच्या पीटीआय पक्षाच्या समर्थकांनी देशभरातील संवेदनशील लष्करी तळांची तोडफोड आणि मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सुमारे 72 तास चाललेल्या या हिंसाचारात रावळपिंडी येथील लष्कराचे जनरल मुख्यालय, लाहोरमधील कॉर्प्स कमांडर हाऊस, जिना हाऊस लाहोर, रेडिओ पाकिस्तानचे पेशावर कार्यालय आणि देशभरातील इतर सरकारी आणि राज्य संस्था कार्यालये आणि इमारतींवर हल्ले करण्यात आले.
पाकिस्तानी लष्कराने आता हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. GHQ रावळपिंडी येथे आयोजित कॉर्स कमांडर्स कॉन्फरन्सच्या विशेष सत्रादरम्यान, लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांना 9 मे पासून झालेल्या हिंसाचार आणि जमावाच्या हल्ल्यांबद्दल माहिती देण्यात आली. या घटनांबाबत पाकिस्तानी लष्कराच्या कमांडर्सनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. भविष्यात 9 मे सारख्या प्रयत्नांची पुनरावृत्ती झाल्यास कोणताही संयम दाखवला जाणार नाही, असे कॉर्स कमांडर्स परिषदेत एकमताने मान्य करण्यात आले.
इम्रान खानवर लष्कर कायदा लागू होणार?जनरल मुनीर यांच्या सैन्याने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ आणि त्यांचे नेते इम्रान खान यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचे म्हटले आहे. यामुळे लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ले झाले आणि त्याप्रकरणी त्यांच्यावर खटला सुरू करण्यात आला आहे. लष्कराने काही प्रकरणांमध्ये आर्मी ऍक्ट आणि ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे हल्ले पूर्वनियोजित रणनीतीचा भाग होते, हे सिद्ध करण्यासाठी पुरावे असल्याचा दावा करण्यात आला आहे.
इम्रान यांचे राजकीय भवितव्य अंधारात
9 मे रोजी इम्रान खान यांच्या लाहोरमधील जमान पार्क निवासस्थानातून इस्लामाबादला रवाना होण्यापूर्वी, त्यांनी पुन्हा एकदा लष्करी आस्थापनांना इशारा दिला होता. त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केल्यास परिणाम भोगण्यास तयार राहा, असे ते म्हणाले होते. आता लष्कर कायदेशीर खटल्यांसह त्यांना प्रत्युत्तर देण्यास तयार आहे. या खटल्यांमुळे इम्रान खानसमोर मोठे आव्हान तयार झाले आहे. त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊन त्यांच्यावर खटला चालवला जाऊ शकतो. याप्रकरणी त्यांना आजीवन कारावास किंवा मृत्यूदंड दिला जाऊ शकतो.