पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानी लष्कराने दोन दिवसांत राजीनामा देण्यास सांगितले आहे. येत्या २८ मार्चला इम्रान खान यांच्यावर विरोधक अविश्वास प्रस्ताव सादर करणार आहेत. त्या आधीच राजीनामा द्या आणि मोकळे व्हा असे लष्कराने म्हटल्याने आता नवीन पंतप्रधान कोण असेल अशी चर्चा सुरु झाली आहे.
पाकिस्तानचे पुढील पंतप्रधानाचे नाव माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पक्षाने म्हणजेच पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ ने जाहीर केले आहे. नवाज शरीफ यांची मुलगी आणि PML-N ची उपाध्यक्ष मरियम नवाझ (Maryam Nawaz) यांनी ने शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) पंतप्रधान पदाचा उमेदवार बनविण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव पारित करण्यास सफल होण्याची आशा व्यक्त केली आहे.
इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या बाहेर पत्रकार परिषदेला संबोधित करताना मरियम यांनी म्हटले की, सर्व विरोधी पक्ष पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल हे एकत्र येऊन ठरवतील. मात्र, आपल्या पक्षाकडून शहबाज शरीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
इम्रान खान हे अविश्वास प्रस्तावामुळे संसदेतील अधिवेशनाला विलंब करण्याच्या प्रयत्नात होते. हे स्पष्टपणे संविधानाचे उल्लंघन होते. असे झाल्याने आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. आता इम्रान खान यांचा खेळ खल्लास झाला आहे. त्यांचा पक्ष फुटला आहे आणि त्यांनाही माहिती आहे, की त्यांना वाचविण्यासाठी कोणी पुढे येणार नाही, असेही मरियम म्हणाल्या.
पीएमएल-एनचे उपाध्यक्ष म्हणाले की, इम्रान हे दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत की अविश्वास प्रस्ताव हा त्यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय कट आहे, परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. इम्रान स्वत: आपल्याच कारस्थानात अडकले आहेत. त्यांनी आपले कर्तव्य चोख बजावले असते तर 10 लाख लोक त्यांच्या विरोधात उभे राहिले नसते, असा आरोपही त्यांनी केला आहे.