अन्य पंतप्रधानांप्रमाणे क्रिकेटपट्टू इम्रान खान देखील पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची इनिंग पूर्ण करू शकले नाहीत. पाकिस्तानच्या राजकारणात रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. मध्यरात्र उलटून गेल्यावर तिथे मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. सरकारशी संबंधीत एकाही व्यक्तीने देश न सोडण्याचे आदेश निघाले आहेत. एअरपोर्ट अलर्टवर ठेवण्यात आले आहेत. असे असताना पुन्हा शरीफांच्या हातात सत्तेचा चेंडू गेल्याने आता भारतासाठी कितपत फायद्याचे ठरू शकेल, यावर चर्चा होऊ लागली आहे.
342 सदस्यांच्या नॅशनल असेम्ब्लीमध्ये इम्रान सरकारविरोधात 174 मते पडली. अगदी काठावर मते पडली असली तरी इम्रान यांची खूर्ची गेली आहे. या सत्तापरिवर्तनाचे अवघे जग साक्ष ठरले आहे. नवाझ शरीफ पंतप्रधान असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसाला अचानक पाकिस्तानात हजेरी लावली होती. आता त्यांचे भाऊ शाहबाज शरीफ पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. मतदानावेळी इम्रान खान संसदेत गैरहजर होते. आज दुपारी २ वाजता नवीन पंतप्रधान निवडला जाणार आहे.
इम्रान खान यांनी गेल्या काही वर्षांपासून भारताविरोधात गरळ ओकली होती. सत्तेत आल्यावरही त्यांनी ते सुरुच ठेवले होते. परंतू सत्ता जाताना त्यांनी भारतावर स्तुतीसुमने उधळली होती. याचबरोबर अमेरिकेला वाकड्यात घेताना पाकिस्तानी सैन्यावरदेखील प्रश्न उपस्थित केले होते. यामुळे शरीफांनादेखील या पावलाचा त्रास होणार आहे. इम्रान खान यांनी नवी दिल्लीशी चर्चेचे मार्ग बंद केले होते. काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यावर तर व्यापारी संबंधही संपविले होते. भाजपा आणि आरएसएसवर त्यांनी टीका सुरुच ठेवली होती. आता त्यांचे सत्तेतून बाहेर गेल्याने दिल्ली-इस्लामाबाद मधील चर्चेचा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे.
चार वर्षांपूर्वी शरीफ यांना सत्ता गमवावी लागली होती. शाहबाज यांच्या रुपाने आता पुन्हा सत्तेत वापसी झाली आहे. इम्रान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. नवाज शरीफ लंडनमध्ये आश्रयाला आहेत. मात्र, शाहबाज यांनी अविश्वास प्रस्तावावेळी त्यांची सतत आठवण काढली. ते भारताशी चांगले संबंध ठेवण्यासाठी प्रयत्नशील होते, असे सांगितले जाते.