Imran Khan Pakistan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान (Imran Khan) यांना तोशाखाना प्रकरणी कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. इस्लामाबाद पोलीस त्यांच्या अटकेचे वॉरंट घेऊन इम्रान यांच्या जमान पार्क येथील निवासस्थानी पोहोचले आहेत. जिओ न्यूजनुसार, न्यायालयाने इम्रानला 7 मार्चपर्यंत हजर करण्याचे आदेश दिले आहेत. इम्रान सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले चौधरी फवाद यांच्यासह अनेक नेते त्यांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत.
इम्रान खान यांना सरकार कोसळल्यानंतर तोशाखाना प्रकरणात त्यांचे संसदेचे सदस्यत्व गमवावे लागले. निवडणूक आयोगाने याबाबत सुनावणी घेतली होती, मात्र इम्रानच्या युक्तिवादावर समाधान न झाल्याने पीटीआय अध्यक्षांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. पाकिस्तानात इतके गाजलेले तोशाखाना प्रकरण काय आहे? जाणून घेऊया...
काय आहे तोशाखाना प्रकरण?
तोशाखाना हा मंत्रिमंडळाचा एक विभाग आहे जिथे राष्ट्रप्रमुख आणि किंवा सर्वोच्च नेते इतर देशांच्या परदेशी पाहुण्यांनी दिलेल्या मौल्यवान भेटवस्तू ठेवतात. नियमानुसार इतर देशांच्या प्रमुखांकडून किंवा मान्यवरांकडून मिळालेल्या भेटवस्तू तोशाखान्यात ठेवणे आवश्यक असते. 2018 मध्ये इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. अरब देशांच्या दौऱ्यांमध्ये त्यांना तेथील राज्यकर्त्यांकडून महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. त्यांना अनेक युरोपीय देशांच्या राष्ट्रप्रमुखांकडूनही मौल्यवान भेटवस्तू मिळाल्या. या भेटवस्तू इम्रान खान यांनी स्वस्तात विकत घेतल्या आणि मोठ्या नफ्यात विकल्या. त्यांच्या सरकारने या संपूर्ण प्रक्रियेला कायदेशीर परवानगी दिली होती.
इम्रानला सुमारे 6 कोटींचा फायदा झालामाजी पंतप्रधानांनी निवडणूक आयोगाला सांगितले होते की, या भेटवस्तू राज्याच्या तिजोरीतून 2.15 कोटी रुपयांना विकत घेतल्या गेल्या आणि त्या विकून त्यांना सुमारे 5.8 कोटी रुपयांचा नफा झाला. या भेटवस्तूंमध्ये एक ग्राफ घड्याळ, कफलिंक्सची एक जोडी, एक महागडा पेन, एक अंगठी आणि चार रोलेक्स घड्याळांचा समावेश होता.
माझे गिफ्ट माझी इच्छा: इम्रानजिओ न्यूजच्या वृत्तानुसार, इम्रानने एकदा सांगितले होते की, या त्यांना मिळालेल्या भेटवस्तू आहेत, ज्या त्यांना वैयक्तिकरित्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पूर्णतः त्यांचा अधिकार आहे. या भेटवस्तू सोबत ठेवायच्या की, नाही हा त्यांचा निर्णय आहे. मात्र, तोशाखाना वादावर इम्रान म्हणतात की, तोशाखान्यातून भेटवस्तू विकल्याचा विरोधी पक्षांचा आरोप बिनबुडाचा आहे. इम्रान खान यांना त्यांच्या साडेतीन वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात जगभरातील विविध नेत्यांकडून 14 कोटींहून अधिक किमतीच्या 58 भेटवस्तू मिळाल्या होत्या. या भेटवस्तूंच्या विक्रीचा तपशील आयकर विवरणपत्रात न दिल्याचा आरोपही त्यांच्यावर होता.