Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना आज(मंगळवारी) अटक करण्यात आली. त्यांना पाकिस्तानी निमलष्करी दलाकडून इस्लामाबाद उच्च न्यायालयातूनच अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयातून इम्रान यांच्या अटकेचे व्हिडिओ समोर आले आहेत. यात पाक रेंजर्स माजी पंतप्रधानांना धक्का देत कारमध्ये बसवताना दिसत आहेत.
काच फोडून आत शिरले
इम्रान खान यांच्या अटकेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात रेंजर्स कोर्टरुमची काच फोडून पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अटक करताना दिसत आहेत. दरम्यान, पीटीआयच्या ट्विटर हँडलवरून आणखी एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यात इम्रान खानचे वकील गंभीर जखमी झाल्याचा दावा पक्षाने केला आहे.
अटक वॉरंट जारी
1 मे रोजी माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे अटक वॉरंट NAB रावळपिंडीने जारी केले होते. आज अखेर पाक रेंजर्सनी त्यांना इस्लामाबादमध्ये अटक केली आहे. पण, पीटीआयचे म्हणणे आहे की, इम्रान यांना घेऊन जाताना कोणतेही वॉरंट दाखवले गेले नाही. पाकिस्तानी मीडियानुसार, अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रानला इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर पाक रेंजर्सनी अटक केली आहे. इम्रान खान आपल्यावर दाखल असलेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये जामीन घेण्यासाठी येथे आले होते.
इस्लामाबादमध्ये कलम 144 लागूइस्लामाबाद पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात इस्लामाबादमधील परिस्थिती सामान्य असल्याचेही म्हटले आहे. मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शहरात कलम 144 लागू करण्यात आले असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.