इस्लामाबाद - पाकिस्तानच्याराजकारणामध्ये आजचा दिवस मोठ्या उलथापालथीचा ठरू शकतो. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला असून, त्यावर आज मतदान होण्याची शक्यता आहे. या घडामोडींदरम्यान, पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशिद यांनी धक्कादायक दावा केला आहे. इम्रान खान यांना अटक केली जाऊ शकते, असा दावा शेख रशिद यांनी केला आहे.
पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशिद म्हणाले की, पंतप्रधान इम्रान खान यांना अटक होऊ शकते. तसेच देशामध्ये नव्याने निवडणुका होऊ शकतात. इम्रान खान एक महान नेते बनले आहेत. त्यांनी पाकिस्तानी जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले पाहिजे. या राजकीय खेळाचा अंतिम सामना हा सार्वत्रिक निवडणूक हाच असेल. सध्या जे सुरू आहे ती सेमीफायनल आहे. या संकटातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग उरला आहे, तो म्हणजे देशामध्ये सार्वत्रिक निवडणूक घेणे.
पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या सरकारसाठी आजचा दिवस निर्णायक आहे. आज त्यांच्याविरोधात सादर झालेल्या अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे. २०१८ मध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी आलेल्या इम्रान खान यांच्यासाठी हे मोठे आव्हान आहे. इम्रान खान यांना साथ देणाऱ्या अनेक खासदारांसह त्यांच्या स्वत:च्या पार्टीमधील अनेक नेत्यांनीही त्यांच्याविरोधात मतदानाचे संकेत दिले आहेत.