पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या जवळच्या नेत्या डॉक्टर फिरदौस आशिक अवान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत फिरदौस टीव्ही शो च्या रेकॉर्डींग दरम्यान एका खासदाराला कानशिलात लगावताना दिसत आहे. पीडित खासदार बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपुल्स पार्टीचे कागिर मंडोखेल आहेत. शोच्या रेकॉर्डींग दरम्यान डॉक्टर फिरदौस काही गोष्टीवरून इतक्या भडकल्या की, त्यांनी खासदार कादिर यांना थेट कानिशिलात लगावली.
व्हायरल व्हिडीओमध्ये बघायला मिळत आहे की, टीव्ही शो दरम्यान नेत्यांमध्ये वाद-विवाद होतो आणि फिरदौस आशिक अवान या अचानक कादिर मंडोखेल यांना कानशिलात लगावतात. फिरदौस यांच्यावर खासदाराला शिव्या दिल्याचाही आरोप आहे. दरम्यान फिरदौस या पंतप्रधान इमरान खान यांच्या विशेष सहायक होत्या आणि सध्या त्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्र्यांच्या विशेष सहायक आहेत. त्या इमरान खान यांच्या जवळच्या मानल्या जातात.
स्थानिक मीडियानुसार, हा सगळा प्रकार पत्रकार जावेद चौधरी यांच्या एक्सप्रेस टीव्हीवरील एका शोच्या रेकॉर्डींग दरम्यान घडला. यानंतर फिरदौस यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्या म्हणाल्या की, पीपीपी खासदार कादिर मंडोखेल यांनी त्यांना आणि त्यांच्या वडिलांना शिवी दिली आणि धमकी देण्याचाही प्रयत्न केला होता. ज्यामुळे हा सगळा प्रकार घडला. त्या म्हणाल्या की, कादिर यांनी त्यांना असं करण्यास भाग पाडलं.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओ आपल्या स्पष्टीकरणात त्या म्हणाला की, या घटनेचा पूर्ण व्हिडीओ जारी केला जावा. जेणेकरून लोकांना कळेल की, मला असं करण्यासाठी भाग पाडलं गेलं. दरम्यान फिरदौस यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप लागले आहेत.