इस्लामाबाद: विश्वचषक स्पर्धेत प्रथमच भारतावर मात केल्यानं पाकिस्तानमध्ये आनंदाचं वातावरण आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताननं १० गडी राखून भारतावर मोठा विजय मिळवला. यानंतर लोकांनी गोळीबार करत विजय साजरा केला. त्यात १२ जण जखमी झाले. यानंतर आता पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी संघाच्या विजयावर भाष्य केलं आहे.
भारतासोबतचे संबंध सुधारण्याची आवश्यकता असल्याचं मत इम्रान खान यांनी सौदी अरेबियात व्यक्त केलं. सध्याची वेळ संवाद साधण्यासाठी योग्य नाही. यामागे रविवारी झालेला भारत-पाकिस्तान सामना कारण असल्याचं खान म्हणाले. टी-२० विश्वचषक स्पर्धेत शेजारी देशाचा पराभव झाला आहे. त्यांच्याशी संबंध सुधारावेत म्हणून संवाद साधायला हवा. पण त्यासाठी ही वेळ योग्य नाही. कारण नुकताच त्यांचा पराभव झाला आहे. भारतासोबत संबंध सुधारल्यास ते दोन्ही देशांसाठी चांगलं असेल, असं खान यांनी म्हटलं. खान सध्या पाकिस्तान-सौदी गुंतवणूक परिषदेसाठी रियाधमध्ये आहेत.
रियाधमध्ये असलेल्या खान यांनी पुन्हा एकदा काश्मीर राग आळवला. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये केवळ एकच विषय आहे आणि तो म्हणजे काश्मीर. दोन सभ्य शेजाऱ्यांप्रमाणे हा प्रश्न सोडवावा लागेल. ७२ वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रात काश्मिरींच्या अधिकाऱ्यांबद्दल खात्री देण्यात आली होती. त्याशिवाय कोणताही मुद्दा आम्हाला महत्त्वाचा वाटत नाही, असं खान म्हणाले.