पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर संभाव्य हल्ल्याची गुप्तचर यंत्रणांनी माहिती दिल्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इम्रान खान यांच्या जीवाला धोका असू शकतो. त्यामुळे हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा वाढवण्यात आली आहे, असे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या खूप चर्चेत आहेत. राजकीय गदारोळात अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणाऱ्या पंतप्रधान इम्रान खान यांनी काल राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर स्पष्ट केले की, ते त्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतरच खुर्ची सोडणार आहेत. दरम्यान, इम्रान खान यांच्यावर हल्ला होऊ शकतो आणि त्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती गुप्तचर सूत्रांकडून मिळाली आहे.
गेल्या आठवडाभरापासून इम्रान खान हे सरकार पाडण्यामागे परकीय षड्यंत्र असल्याचा आरोप करत, त्यासंबंधीचे पत्र दाखवत होते. तसेच, इम्रान खान यांनी दावा केला होता की, पत्रात त्यांना भूमिका बदलण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत आणि तसे न केल्यास त्यांना सत्तेतून बेदखल केले जाईल असे म्हटले होते. काल दिलेल्या भाषणात त्यांनी याचा उल्लेखही केला होता, मात्र यावेळी थेट अमेरिकेचे नाव घेत रशिया आणि चीनसोबत पाकिस्तानची असलेली जवळीक अमेरिकेला सहन होत नाही, असेही इम्रान खान यांनी म्हटले होते.
बहुमतासाठी 172 मतांची आवश्यकतापाकिस्तानमध्ये इम्रान खान यांची खुर्ची वाचवण्यासाठी 342 सदस्यीय पाकिस्तानी संसदेचे कनिष्ठ सभागृह नॅशनल असेंब्लीमध्ये बहुमतासाठी 172 मतांची आवश्यकता आहे. मुताहिदा कौमी मूव्हमेंट पाकिस्तानने पाठिंबा काढून घेतल्यानंतर सत्ताधारी आघाडीकडे केवळ 164 खासदार आहेत, तर विरोधी पक्ष 177 खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करत आहेत, परंतु त्यापैकी केवळ 172 संसदेत पोहोचले आहेत. म्हणजेच पाकिस्तानमधील चित्र अद्याप अस्पष्ट आहे.