जेलमध्ये असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या कुटुंबीयांनी मोठा आरोप केला आहे. इम्रान खान यांच्या बहिणीने न्यूज 18 ला सांगितलं की, लष्कराला इम्रान यांची हत्या करायची आहे. निवडणुकीत पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाला दोन तृतीयांश बहुमत मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर परिस्थिती काहीशी अशीच आहे.
250 जागांवर मतमोजणी पूर्ण झाली असून अपक्ष उमेदवारांनी सर्वाधिक 99 जागा जिंकल्या आहेत. यातील बहुतांश उमेदवारांना माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयचा पाठिंबा आहे. बहीण अलीमा खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्रकरणांमध्ये असं घडलं की, इम्रान खान यांचा पाठिंबा असलेले उमेदवार 80 हजारांहून अधिक मतांनी पुढे असूनही त्यांना पराभूत घोषित करण्यात आलं. दिवसाढवळ्या लूटमार झाली आणि मतांची चोरी झाली. नवाझ शरीफ यांचा पक्ष फक्त 50-60 जागा जिंकत आहे आणि त्यातही चोरी करत आहे.
"दोन वेळा इम्रान खान यांच्या हत्येचा झाला प्रयत्न"
अलीमा यांनी "मी अद्याप इम्रान खान यांना भेटलेली नाही" असं म्हटलं आहे. आम्ही इम्रान यांना भेटू शकलो नाही, पण उद्या भेटू शकतो असं सांगत निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी इम्रान यांच्या हत्येचा दोनदा प्रयत्न झाला होता. कोणी केलं हे आम्हाला माहीत आहे. आता तुरुंगात असताना त्यांच्या विजयानंतर परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे असंही बहिणीने म्हटलं.
इम्रान खान जेलमध्ये असून त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. इम्रान यांच्या पक्षाने निवडणुकीत विजयाचा दावा केला आणि निकालांमध्ये हेराफेरी करण्यासाठी निवडणूक निकाल जाहीर करण्यात विलंब केल्याचा आरोप केला. "रात्री उशीरा निकालात फेरफार करणे पूर्णपणे लज्जास्पद आणि उघडपणे केलेली चोरी आहे. पाकिस्तानच्या जनतेने हेराफेरीचे निकाल पूर्णपणे नाकारले. जग पाहत आहे" असं पक्षाने म्हटलं आहे.