इस्लामाबाद: रशिया-युक्रेन संघर्षाच्या (Russia-Ukraine Conflict) पार्श्वभूमीवर दोन्ही देशातील वाढत्या तणावाचा संपूर्ण जगावर परिणाम होताना दिसत आहे. कच्च्या तेलापासून ते सोन्यापर्यंत अनेकविध गोष्टींचे दर नवे उच्चांक गाठत आहेत. अशातच युरोपियन युनियनच्या सदस्य राष्ट्रांसह २२ राजनैतिक मिशनच्या प्रमुखांनी युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाचा निषेध करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील ठरावाला पाठिंबा देण्याचे पाकिस्तानला आवाहन केले होते. यावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) संतप्त झालेले पाहायला मिळाले. अशा आशयाचे पत्र तुम्ही भारताला लिहिले आहे का, तुम्ही सांगाल ते करायला पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का, अशी विचारणा इम्रान खान यांनी केली आहे.
युरोपियन युनियनच्या राजनैतिक दूतांनी युक्रेनमधील रशियाच्या कृतींचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानला आग्रह केला होता. गेल्या आठवड्यात यासंदर्भातील एक पत्र सार्वजनिक करण्यात आले होते. युरोपियन युनियने घेतलेल्या मतदानात पाकिस्तान जो पाश्चात्य देशांचा पारंपारिक मित्र राष्ट्र म्हणून ओळखला जातो, तो मतदानापासून दूर राहिला. या महासभेत संयुक्त राष्ट्र महासभेने युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल रशियाला जोरदार फटकारले होते.
सांगाल ते करायला पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का
तुम्हाला आमच्याबद्दल काय वाटते? आम्ही तुमचे गुलाम आहोत का? तुम्ही जे बोलाल ते आम्ही करू, असे तुम्हाला वाटते का, अशा प्रश्नांच्या फैरी झाडत मला युरोपियन युनियनच्या राजदूतांना विचारायचे आहे, की तुम्ही भारताला असे पत्र लिहिले आहे का, अशी रोखठोक विचारणा इम्रान खान यांनी केली आहे. अफगाणिस्तानातील पाश्चात्य नाटोला पाठिंबा दिल्याने पाकिस्तानला त्रास सहन करावा लागला आणि कृतज्ञतेऐवजी टीकेला सामोरे जावे लागल्याचे सांगत आम्ही रशियाचे मित्र आहोत आणि आम्ही अमेरिकेचेही मित्र आहोत; आम्ही चीन आणि युरोपचे मित्र आहोत, आम्ही कोणत्याही कॅम्पमध्ये नाही. पाकिस्तान तटस्थ राहील आणि जे युक्रेनमधील युद्ध संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांच्यासोबत काम करेल, असे इम्रान खान यांनी नमूद करत भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाचा बारावा दिवस आहे. जागतिक दबाव आणि सर्व कठोर निर्बंध असूनही, रशियाचे हल्ले तीव्र होत आहेत. रशिया सातत्याने युक्रेनमधील रहिवासी भागांना लक्ष्य करत आहे. त्यामुळे जगभरातील देशांना आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.