इस्लामाबाद : जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याने पाकिस्तान बिथरला आहे. तेव्हापासून पाकिस्तानचे मंत्री, लष्करी अधिकाऱ्यांसह पंतप्रधान इम्रान खानही युद्धाची भाषा करत आहेत. संयुक्त राष्ट्रांतही पाकिस्तान तोंडावर पडला आहे. भारताचे लष्करी सामर्थ्य माहित असूनही आणि युद्धांत पराभव पत्करूनही पाकिस्तान सुधरलेला नाही.
पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला दोन तीनदा अणुयुद्धाची धमकी दिली आहे. मात्र, त्यांनीच एका मुलाखतीमध्ये पराभव मान्य केला आहे. अल जझीराला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी भारतासोबत युद्ध झाले तर पाकिस्तान तोंडावर आदळेल असे म्हटले आहे. त्यांनी हे वक्तव्य भारताला दिलेल्या अणुयुद्धाच्या धमकीवर विचारलेल्या प्रश्नावर केले आहे.
पाकिस्तान कधीही आण्विक युद्धाला सुरूवात करणार नाही. मी युद्धविरोधी आहे. युद्ध हे काही समस्यांचे समाधान असू शकत नाही. त्याचे परिणाम चांगले नसतात, असे इम्रान यांनी म्हटले आहे. मात्र, पाकव्याप्त काश्मीरमध्ये 13 सप्टेंबरला दिलेल्या भाषणात त्यांनी पाकिस्तानच्या युवकांना भडकावताना एलओसीवर आता जाऊ नका, मी तुम्हाला सांगेन कधी जायचे आहे ते, असे वक्तव्य केले होते.
मुलाखतीमध्ये इम्रानने म्हटले की, जेव्हा दोन अण्वस्त्रधारी देश लढतात, तेव्हा त्यांच्यातील युद्ध आण्विक होण्याची शक्यता अधिक असते. जर भारताविरोधात आम्ही हरत असू तर आम्ही एकतर आत्मसमर्पण करू किंवा शेवटच्या श्वासापर्यंत लढू. मला माहित आहे पाकिस्तान शेवटच्या श्वासापर्यंत लढेल आणि जेव्हा अण्वस्त्रधारी देश शेवटच्या श्वासापर्यंत लढतो तेव्हा त्याचे परिणाम वाईटच असतात. यामुळेच आम्ही संयुक्त राष्ट्रांकडे धाव घेतली. दोन्ही देशांदरम्यान युद्ध झाल्यास त्याचा भारतीय उपमहाखंडावर गंभीर परिणाम होईल, अशी धमकीही त्याने दिली आहे.