इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी आज शपथ घेतली. यावेळी भारताचे नवज्योतसिंग सिद्धू आणि जगभरातून मान्यवर उपस्थित होते. शुक्रवारी संसदेमध्ये त्यांना देशाचा 22 वा पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले.
शपथ ग्रहण समारंभाला पोहोचली तिसरी पत्नीइम्रान खान यांच्या शपथविधी समारंभाला पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू, लष्कराचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी इम्रान यांची तिसरी पत्नी बुशरा ही देखील उपस्थित होती. बुरख्यामध्ये आलेल्या बुशरा या सतत माळ जपताना दिसत होत्या.
पाकिस्तानमध्ये 25 जुलै रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इम्रान यांच्या पीटीआयला सर्वाधिक बहुमत मिळाले होते. पाकिस्तानच्या संसदेचे अध्यक्ष असद कैसर यांनी काल इम्रान खान यांना पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकल्याचे जाहीर केले. त्यांच्याविरोधात माजी पंतप्रधान व सध्या तुरुंगात असलेले नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ उभे राहिले होते. मात्र, इम्रान यांना 176 मते पडली. यामुळे विरोधकांनी अध्यक्षांचा हा निर्णय मंजून नसल्याचा घोषणा दिल्या.
पाकिस्तान पिपल्स पार्टी हा संसदेमध्ये तिसरा मोठा पक्ष आहे. मात्र, त्यांनी शरीफ यांना पंतप्रधानपदासाठी समर्थन देण्यास नकार दिला. तसेच मतदानावर बहिष्कार टाकला.
इम्रान खान यांनी प्रचारावेळी शरीफ यांच्या सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरला होता. तसेच निवडून आल्यानंतरच्या भाषणात त्यांनी देशामध्ये वेगाने विकास आणण्याचे सांगितले होते. तसेच देशाबाहेर गेलेल्या संपत्तीला परत आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.