इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये लष्करालाच डोईजड झालेले इम्रान खान यांचे सरकार आपणच जिंकवून आणल्याचा दावा तेथील लष्करप्रमुख्यांनी केला आहे. सरकार आणि लष्कराच्या बळजबरीविरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येत आवाज उठविण्यास सुरुवात केली होती. इम्रान खान यांना सत्तेत आणण्यासाठी 2018 मध्ये मोठे कारस्थान रचण्यात आले, असे आरोप पाकिस्तान पिपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज (पीएमएल-एन) लष्करावर केले. यावर जनरल कमर जावेद बाजवा यांनी सांगितले की, सैन्याने केलेल्या कारवाया या योग्य आणि देशाच्या हिताच्या होत्या असे प्रत्यूत्तर दिले आहे.
पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच विरोधी पक्षांनी लष्कराविरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. याआधी केवळ सैन्य राजकीय हस्तक्षेप करत असल्याचा आरोप झाले होते. पाकिस्तानी सैन्यावर पहिला हल्ला माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केला आहे. इम्रान खानला सत्ते आणण्यासाठी सैन्याने 2018 च्या निवडणुकीत मोठा घोटाळा केला आहे. वर्दी घालून देशाच्या राजकारणात हस्तक्षेप करणे हे देशद्रोहासारखेच आहे, असा आरोप शरीफ यांनी केला होता. या गंभीर आरोपांमुळे संतापलेल्या इम्रान खान यांनी आयएसआय आणि सैन्य़ाचा अपमान करून शरीफ खूप खतरनाक चाल खेळत आहेत, असा आरोप केला होता. तसेच निवडणुकीत लष्कराचा कोणताही हात नव्हता असेही म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे नवाझ शरीफ तीनवेळा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले होते, मात्र एकदाही कार्यकाळ पूर्ण करू शकले नव्हते.
यानंतर ता पिपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो झरदारी यांनीही शुक्रवारी सैन्यावर आरोप लावले आहेत. जर गिलगिट बाल्टिस्तानच्या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप झाल तर इस्लामाबादमध्ये घेराव घातला जाईल आणि आंदोलने केली जातील, असा इशाराही दिला आहे. लष्कराचे अत्याचार एवढे वाढलेत की जनरस झिया आणि मुशर्रफ यांच्या काळातही पाहिले नाहीत. मतदान केंद्रात एक आणि बाहेर एक असे दोन सैनिक कसे काय तैनात केले जाऊ शकतात, याचे आश्चर्य वाटत असल्याचे ते म्हणाले.
यावर पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी शनिवारी सांगितले की जी काही कारवाई केली गेली ती, संविधानाला धरून आणि देश हितासाठी होती. पाकिस्तान सैन्य अकादमीच्या पासिंग आऊट परेडला ते संबोधित करत होते. लष्कर पाकिस्तान सरकारचे समर्थन सुरुच ठेवणार आहे. या वक्तव्यावरून बाजवा यांनी इम्रान सरकार जिंकविल्याची स्पष्ट कबुलीच दिली आहे.