इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर दोन्ही देशांना भेडसावत असलेल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाद विकोपाला गेलेला असताना इम्रान खान यांनी दुसऱ्यांना दोन्ही देशांमध्ये चर्चा व्हावी, अशी इच्छा बोलून दाखवली आहे. मोदींना लिहिलेल्या पत्रात इम्रान म्हणतात, लोकसभा निवडणुकीत तुम्हाला पुन्हा एकदा जनतेनं पंतप्रधान म्हणून निवडून दिल्याबद्दल मी अभिनंदन करतो. काश्मीरच्या वादग्रस्त मुद्द्यासह इतर सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा व्हावी, अशी पाकिस्तानची इच्छा आहे. दोन्ही देशांनी एकमेकांना मदत केल्यास हे प्रश्न सुटू शकतात. जेणेकरून जनता गरिबीतून मुक्त होऊ शकेल. तसेच दोन्ही देशांच्या विकासासाठी ही चर्चा महत्त्वाची असल्याचंही इम्रान खान यांनी सांगितलं आहे. पाकिस्तानला दक्षिण आशियात शांती हवी आहे. त्यामुळेच स्थिरता आणि क्षेत्रीय विकासासाठी ही चर्चा महत्त्वाची आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विजयाबद्दल फोनवरून अभिनंदन केलं.दोन्ही देश जनतेच्या भल्यासाठी काम करतील, अशी आशा खान यांनी व्यक्त केली. भारतीय उपखंडाच्या समृद्धासाठी हिंसामुक्त आणि दहशतवादमुक्त वातावरण आवश्यक असल्याचं मोदींनी खान यांना सांगितलं. फेब्रुवारीत पुलवामात झालेला हल्ला, त्यानंतर भारतानं केलेला एअर स्ट्राइक या घटनांमुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी प्रथमच फोनवरुन संवाद साधला होता. पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. त्यानंतर भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाकिस्तानची नाकेबंदी केली होती. त्यानंतर आता पाकिस्तानकडून वारंवार चर्चेची मागणी केली जात आहे.
आता तरी भारतानं काश्मीरसह इतर मुद्द्यांवर चर्चा करावी, इम्रान खान यांची मोदींना विनवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2019 9:06 AM