इस्लामाबाद: माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून शनिवारी शपथविधी झाल्यावर त्यांच्या ‘तहरिक-ए-पाकिस्तान’ (पीटीआय) पक्षाने त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची नावे रविवारी जाहीर केली. यात १६ मंत्री व पाच मंत्र्याचा दर्जा असलेले सल्लागार असतील. मंत्रिमंडळाचा शपथविधी सोमवारी होईल.इम्रान खान प्रथमच पंतप्रधान होत असले तरी त्यांच्या मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्री अनुभवी असून पूर्वी त्यांनी लष्करशहा जनरल परवेज मुशर्रफ यांच्या किंवा पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या सरकारांमध्ये मंत्रीपदे भूषविलेली आहेत. पक्षाने जाहीर केलेल्या यादीनुसार मुरब्बी राजकारणी आणि पक्षाचे उपाध्यक्ष असलेले शाह मेहमूद कुरेशी हे नवे परराष्ट्रमंत्री असतील. मुंबईवर २६/११चा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या सरकारमधये कुरेशी हेच परराष्ट्रमंत्री होते व योगायोगाने ते त्या दिवशी नवी दिल्लीतच आलेले होते.परवेज खट्टक संरक्षणमंत्री तर असद उमर वित्तमंत्री असतील. असद उमर हे १९७१ च्या युध्दात भारताविरुद्ध लढलेल्या लेप्ट. जनरल मोहम्मद उमर यांचे चिरंजीव आहेत. शिरीन मझारी, झुबेदा जलाल आणि फेहमिदा मिर्झा या इम्रान यांच्या टीममधील तीन महिला मंत्री असतील. (वृत्तसंस्था)
इम्रान खान यांची तीन महिलांसह १६ मंत्र्यांची टीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:17 AM