इस्लामाबाद - पुलवामा येथील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने केलेल्या जबरदस्त एअर सर्जिकल स्ट्राईकमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये जबरदस्त तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा शांततेचा राज आळवला आहे आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोघेही सशस्त्र देश आहेत, युद्धामुळे कुणाचेही भले होणार नाही. त्यामुळे आपल्याला चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवावे लागतील, आम्ही चर्चेस तयार आहोत, असा दावा इम्रान खानने केला आहे. इम्रान खान म्हणाले की, ''भारताने काल केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून आम्ही कारवाई केली आहे. मात्र युद्ध हे कुठल्याही गोष्टीचा पर्याय ठरू शकत नाही. भारत आणि पाकिस्तान दोघेही शस्त्रसज्ज देश आहेत. त्यामुळे युद्ध झाल्यास गंभीर परिणाम होतील. त्यामुळे दोन्ही देशांना युद्ध परवडणार नाही.'' '' जे युद्ध सुरू करतात त्यांनाही या युद्धाचा शेवट काय असेल हे ठावूक नसते. आज युद्धाला तोंड फुटल्यास त्यावर माझे वा मोदींचे नियंत्रण राहणार नाही. त्यामुळे तुम्ही दहशतवादावर चर्चेला तयार असाल तर आम्हीही चर्चेला तयार आहोत.'' असेही इम्रान खान यांनी सांगितले.
भारताच्या एअरस्ट्राइकनंतर इम्रान खानकडून शांततेवर प्रवचन, दिले चर्चेचे निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 4:35 PM