इस्लामाबाद : पाकिस्तानात आर्थिक संकटासह राजकीय गदारोळही वाढत चालला आहे. माजी पंतप्रधान व पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इम्रान यांना अटक होणार असल्याचे समजल्यानंतर, समर्थकांनी लाहोरमधील त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली आहे. त्यामुळे तणाव निर्माण झाला असून, परिस्थिती बिघडू नये, म्हणून पोलिसांनी घराभोवती चोख बंदोबस्त ठेवला आहे. कोषागारातील भेटवस्तू स्वस्तात खरेदी करून, नंतर चढ्या भावाने विकल्याचा इम्रान यांच्यावर आरोप आहे. याबाबत त्यांना पाच वर्षांसाठी अपात्र घोषित करण्यासह त्यांचे संसद सदस्यत्वही रद्द केले आहे.
याचिका फेटाळलीया प्रकरणी इम्रान यांना दोन दिवसांपूर्वीच दहशतवादविरोधी न्यायालयात (एटीसी) हजर व्हायचे होते. मात्र, ते हजर झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांचे अटक वॉरंट काढले होते. याविरुद्ध इम्रान यांनी लाहोर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तेथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. गुरुवारी न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली.
माजी गृहमंत्र्यांना अटकपाकचे माजी गृहमंत्री शेख रशीद यांना बुधवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. रशीद यांच्या अटकेचा संबंध माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्यावरील इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोप आहे.