इस्लामाबाद : माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर असून त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल अकाउंटिबिलिटी ब्युरोला दिला. त्यानंतर इम्रान यांना येथील पोलिस लाइन्स गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले. शुक्रवारी उच्च न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयासमोर इम्रान यांना गुरुवारी हजर करण्यात आले. इस्लामाबाद उच्च न्यायालयात इम्रान खान यांना ज्या पद्धतीने अटक झाली त्याबद्दल सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने गुरुवारी संताप व्यक्त केला.
आता राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा; दिल्लीच्या परवानगीवरच इच्छुकांची संधी अवलंबून
न्यायालयात असताना एखाद्याला अटक कशी काय होऊ शकते, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला. कोणत्याही व्यक्तीचा न्याय मिळविण्याचा हक्क आपण कसा काय नाकारू शकतो, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला. कोर्ट रजिस्ट्रारच्या परवानगीशिवाय न्यायालयातून कोणालाही अटक करता येत नाही या नियमाची सर्वोच्च न्यायालयाने आठवण करून दिली.
अटकपूर्व जामिनासाठी केला होता अर्ज
इम्रान खान यांचे वकील हमीद खान यांनी सांगितले की, अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी इम्रान खान यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता. तरीही ९० ते १०० रेंजर्सनी न्यायालयाच्या इमारतीत शिरून इम्रान खान यांना अटक केली.
कुरेशी यांनाही अटक इम्रान खान यांचे निकटवर्तीय व माजी परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना हिंसक निदर्शने केल्याच्या आरोपाखाली गुरुवारी अटक करण्यात आली.