सौदी अरेबियाची प्रतिमा कायम रूढीवादी, परंपराप्रिय अशीच होती, पण गेल्या काही वर्षांत या देशानं अक्षरश: कात टाकली आहे आणि त्यांच्या दृष्टीनं अतिशय प्रागतिक निर्णय घेण्याचा झपाटा त्यांनी लावला आहे. अर्थातच आपल्या देशाला कोणीही ‘मागास’ म्हणू नये आणि विकसित देशांच्या किमान मांडीला मांडी लावून तरी बसता येईल, या दृष्टीनं सौदीचे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांचा प्रयत्न आहे. महिलांच्या दृष्टीनं तर या देशानं अलीकडे खूपच प्रागतिक असे निर्णय घेतले आहेत.
महिलांना मोठ्या प्रमाणात सूट, सवलती आणि मुख्य म्हणजे ‘महिला’ म्हणून ज्या अनेक गोष्टी आजपर्यंत त्यांच्या देशांत अमान्य होत्या, त्यातल्या अनेक गोष्टींना आता त्यांनी परवानगी दिली आहे. गेली कित्येक वर्षे तर महिलांना साधा कार चालवण्याचाही हक्क नव्हता. पण तो हक्क त्यांना अलीकडच्या काही वर्षांत मिळाला आहे. त्याशिवाय ट्रेन चालवणाऱ्या, विमान चालवणाऱ्या महिला आता सौदी अरेबियात दिसायला लागल्या आहेत. इतकंच काय सौदी अरेबियातील महिलांसाठी आता अंतराळात जाण्यासाठीही मज्जाव नाही.
या पार्श्वभूमीवर एका घटनेनं सगळ्या जगाचं लक्ष सौदी अरेबियाकडे वेधून घेतलं आहे. सौदी अरेबियाची सौंदर्यवती आता चक्क ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेतही भाग घेणार आहे. याआधी या स्पर्धेत भाग घेण्याची सौदीच्या सौंदर्यवतींना परवानगी नव्हती. रुमी अल-कहतानी या सुंदरीच्या रूपानं सौदी अरेबिया पहिल्यांदाच या स्पर्धेत आता दिसेल! रुमी स्वत:च या बातमीनं अतिशय उत्साहित झाली असून देशातील नागरिकांनी, इतकंच काय परदेशी नागरिकांनीही याबाबत सौदी अरेबियाचं अभिनंदन करताना रुमीला शुभेच्छा दिल्या आहेत. २७ वर्षीय रुमी सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील रहिवासी असून पेशाने ती मॉडेल असून सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर तिचे दहा लाखांपेक्षाही अधिक फॉलोअर्स आहेत. या वर्षीच्या अखेरीस मेक्सिको येथे होणाऱ्या मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेत रुमी आपल्या देशाची अधिकृत प्रतिनिधी असेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिस युनिव्हर्स स्पर्धेत स्विम सूट इव्हेंट नसतो. कदाचित यामुळेही रुमीला या स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी मिळाली असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच तोडीची दुसरी आणि तितकीच मानाची स्पर्धा म्हणजे ‘मिस वर्ल्ड’! या स्पर्धेत सौदी अरेबियाच्या सुंदरीला प्रतिनिधित्व मिळेल का, याविषयीचे अंदाज आता बांधले जात आहेत. कारण ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत स्विम सूट हा इव्हेंट असतो. काहीही असो, मिस युनिव्हर्स स्पर्धेत सौदी अरेबियाची सुंदरी अधिक प्रतिनिधी म्हणून जगातील इतर सौंदर्यवतींशी स्पर्धा करताना दिसेल ही खूप मोठी घटना मानली जात आहे. मिस युनिव्हर्स स्पर्धेत स्विम सूट इव्हेंटऐवजी ‘ट्रॅडिशनल वेअर’ इव्हेंट असतो. हा इव्हेंट मिस वर्ल्ड स्पर्धेत नसतो.
रुमीनं याआधीही अनेक सौंदर्य स्पर्धा गाजवल्या आहेत. मिस सौदी अरेबिया, मिस मिडल ईस्ट, मिस अरब वर्ल्ड पीस आणि मिस वुमन (सौदी अरब) यासारख्या अनेक सौंदय स्पर्धांत रुमीनं विजेतेपद मिळवलं आहे. जागतिक पातळीवर आपल्याला आता प्रतिनिधित्व करायला मिळणार यामुळे रुमीही अतिशय रोमांचित झाली आहे. या स्पर्धेतही देशाचं नाव झळकवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करीन, असा आशावाद व्यक्त करताना, या स्पर्धेत भाग घेणारी सौदीची पहिली महिला बनण्याचा मान मला मिळतोय, याचा आनंद आणि अभिमान अवर्णनीय आहे, अशी पोस्ट तिनं सोशल मीडियावर टाकली आहे. तीही खूपच व्हायरल होते आहे. देशातल्या आणि जगातल्या अनेकांनी तिच्या निवडीबद्दल तिचं अभिनंदन केलं आहे. एका यूजरनं म्हटलं आहे, तुझ्या या यशाचा आम्हाला गर्व आहे. दुसऱ्या यूजरनं म्हटलं आहे, महिलांना आजवर खूप सोसावं लागलं आहे, पण इथेही तू स्वत:ला सिद्ध करशील याची आम्हाला खात्री आहे, तर आणखी एक यूजर म्हणतो, सौदी अरेबियाचीच नाही, तर जगातली तू सर्वांत सुंदर तरुणी आहेस! तुझ्याशी टक्कर घेताना जगभरातल्या सौंदर्यवतींचा नक्कीच कस लागेल!
१९५२मध्ये झाली होती पहिली स्पर्धा‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा पहिल्यांदा १९५२मध्ये घेतली गेली होती. त्या वेळेपासूनच देशोदेशीच्या सौंदर्यवतींमध्ये या स्पर्धेविषयी आकर्षण होतं. लेबनॉन आणि बहारीनसारखे देशांतील ललनाही या स्पर्धेत भाग घेत होत्या, पण सौदी अरेबियासारख्या देशांनी ‘पाश्चात्त्य थेर आणि असांस्कृतिक’ म्हणून या स्पर्धांकडे कायम पाठच फिरवली होती. ‘मिस युनिव्हर्स’चा किताब सध्या निगारागुआच्या शेन्निस पलोसियोस हिच्याकडे आहे. गेल्या वर्षी ही स्पर्धा तिनं जिंकली होती. यावर्षी ज्या देशाची सुंदरी ही स्पर्धा जिंकेल तिच्या शिरावर हा मानाचा मुकुट विराजमान होईल.