अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन थांबलेल्या सायकलवरून एकदा पडले होते.. कोलोराडो येथे झालेल्या एअरफोर्स अकॅडमीच्या कार्यक्रमात ते खाली पडले होते.. संसदेत चर्चा सुरू असताना अमेरिकन संसदेत झालेल्या हिंसाचाराची तारीख ते विसरले होते.. जानेवारीऐवजी ६ जुलै ही तारीख त्यांच्याकडून सांगितली गेली होती.. विमानाच्या पायऱ्या चढताना पाय घसरून ते पडले होते.. जी-२० शिखर परिषदेच्या दरम्यानही पायऱ्या चढत असताना खाली पडता पडता ते वाचले होते.. याआधी बाली येथे झालेल्या जी-२० शिखर परिषदेच्या दरम्यान त्यांचा एक फोटो जगभर खूप व्हायरल झाला होता. या शिखर परिषदेच्या दरम्यान त्यांच्या हातात एक कागद होता. परिषदेच्या दरम्यान त्यांनी काय काय करायचं आहे, याची तपशीलवार यादी त्या कागदावर लिहिलेली होती. त्यात अगदी प्राथमिक गोष्टींचीही माहिती होती. उदाहरणार्थ, हॉलमध्ये गेल्यावर त्यांनी काय काय करायचं आहे, कुठे बसायचं आहे, किती वेळ बोलायचं आहे.. इत्यादी..
याच कारणांवरून अमेरिकेत सध्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टीका होत आहे. त्यांची स्मरणशक्ती आणि डिमेन्शिया यावरून अमेरिकेत खुलेपणानं वादविवाद, चर्चा झडत आहेत. आपल्यावरील आरोपांचं खंडन करताना आपल्याला स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शिया झालेला नाही, असं जाहीर करण्यासाठी नुकतीच त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. या पत्रकार परिषदेत गाझापट्टीच्या संदर्भात प्रश्न विचारला गेल्यावर हमास या अतिरेकी संघटनेचं नाव ते विसरले. त्यानंतर इजिप्तचे नेता अब्देल फतह अली-सीसी यांना त्यांनी मेक्सिकोचे राष्ट्रपती बनवून टाकलं ! या कारणांवरून त्यांच्या स्मृतिविषयीच्या चर्चा आणखीच वाढल्या आहेत. ज्यो बायडेन यांनी डिमेन्शिया टेस्ट द्यावी आणि आपली स्मृती योग्य आहे हे सिद्ध करावं, अशी मागणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इतरही अनेक राजकीय नेते, तज्ज्ञांनी केली आहे. त्यासाठी व्हाइट हाऊसला त्यांनी साकडंही घातलं आहे. अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद सांभाळणारे ज्यो बायडेन हे अमेरिकेचे सर्वांत ज्येष्ठ नेते आहेत. सध्या त्यांचं वय ८१ वर्षे असून, २० जानेवारी २०२१ रोजी त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली होती.
काही दिवसांपूर्वीच एका वर्गीकृत दस्तऐवजात बायडेन यांचा उल्लेख ‘चांगला हेतू, पण खराब स्मरणशक्ती असलेला वृद्ध माणूस’ असा करण्यात आला होता. बऱ्याच तज्ज्ञांचं याबाबत एकमत आहे की, बायडेन यांनी डिमेन्शिया टेस्ट दिल्यानंतर आणि ही टेस्ट ते उत्तीर्ण झाल्यानंतरच आपण मानसिक तसेच स्मरणशक्तीबाबत निरोगी असल्याचं ते सिद्ध करू शकतील. त्यासाठी ही टेस्ट त्यांनी द्यायलाच हवी. यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही २०१८मध्ये ही टेस्ट दिली होती आणि ही टेस्ट त्यांनी उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली होती. या टेस्टमध्ये २६ गुण ‘नॉर्मल’ मानले जातात. ट्रम्प यांना त्यावेळी पैकीच्या पैकी म्हणजे तीस गुण मिळाले होते !
कॅनडामध्ये १९९६ मध्ये पहिल्यांदा अशा प्रकारची टेस्ट सुरू करण्यात आली. ‘मॉन्ट्रियल कॉग्निटिव्ह असेसमेंट’ (एमओसीए) असं त्याला म्हटलं जातं. स्मृतिभ्रंश शोधण्यासाठीची सर्वात विश्वासार्ह चाचणी म्हणून जगभरात या टेस्टची ख्याती आहे. एकाग्रता, लक्ष, स्मृती, भाषा, फोकस, कार्य आणि व्हिज्युअल स्किल्सचं मूल्यांकन या चाचणीद्वारे केलं जातं. ही चाचणी तशी केवळ दहा मिनिटांची, पण त्यात अनेक घटकांचं मूल्यमापन केलं जातं. उंट, सिंह, गेंड्यासारखे प्राणी ओळखणं, सोप्या ते अवघड बेरीज, वजाबाक्या, सांगितलेलं वाक्य, शब्द जसेच्या तसे म्हणून दाखवणं, बाराखडी म्हणताना एखादं विशिष्ट अक्षर पुन्हा आलं की हात वर करणं, आत्ता तुम्ही कोणत्या शहरात आहात ते वार, तारखेसह सांगणं, दोन वस्तूंमधला सहसंबंध ओळखणं.. यासारख्या गोष्टी करायला सांगितल्या जातात. ७७ वर्षीय डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत पुन्हा चर्चेत आले असले आणि समजा कदाचित ते पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाले, तरीही थोड्याच कालावधीत त्यांच्याही स्मरणशक्तीच्या टेस्टची मागणी पुन्हा सुरू होईल असं ‘भाकीत’ अनेक तज्ज्ञांनी वर्तवलं आहे. त्यामुळे अमेरिकेत सध्या युवा नेतृत्वाच्या मागणीनं जोर पकडला आहे.
आता अमेरिकनांना हवंय तरुण नेतृत्व ! फेब्रुवारी २०२२ मध्येही, व्हाइट हाऊसचे माजी फिजिशियन रॉनी जॅक्सन यांच्यासह ३७ खासदारांनी औपचारिक पत्र लिहून बायडेन यांच्या स्मरणशक्तीची चाचणी घेण्याची मागणी केली होती. एनबीसी न्यूजनं यासंदर्भात नुकताच एक देशव्यापी सर्व्हे केला. त्यात अमेरिकेच्या तब्बल ६२ टक्के मतदारांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याविषयी चिंता व्यक्त केली. अमेरिकेला आता तरुण नेतृत्वाची गरज आहे, असंही त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं.