लिब्रेविले : मध्य आफ्रिकेतील तेलसाठ्यांनी संपन्न असलेल्या गॅबॉन या देशात लष्कराने बंड केले असून, तेथील राष्ट्राध्यक्ष अली बाँगो ओंडिंबा यांची सत्ता उलथवून त्यांना नजरकैदेत ठेवले आहे. या राष्ट्राध्यक्षांच्या कुटुंबाने सुमारे ५३ वर्षे गॅबॉनवर राज्य केले होते. याआधी आफ्रिका खंडातील माली, गिनी, बुर्किना फासो, चाड, नायजेरमध्ये लष्कराने बंड केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती आता गॅबॉनमध्ये झाली.
लष्करी बंडानंतर प्रथमच अली बाँगो ओंडिंबा यांचे जनतेला दर्शन झाले. आपली राजवट उलथविल्याच्या घटनेचा जनतेने रस्त्यावरून उतरून निषेध करावा, असे आवाहन त्यांनी केले होते. जनता रस्त्यावर उतरली; पण तिने राष्ट्राध्यक्ष ओंडिंबा यांच्या बाजूने आवाज उठविण्याऐवजी त्यांची राजवट उलथल्याबद्दल आनंद व्यक्त केला. (वृत्तसंस्था)
गोळीबाराच्या घटनासत्ता उलथवून लावल्यानंतर राजधानी लिब्रेविलेमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. गॅबॉन या देशात २७ ऑगस्टला झालेल्या निवडणुकांत राष्ट्राध्यक्ष ओंडिंबा यांना ६४.२७ टक्के, तर प्रतिस्पर्धी उमेदवार अल्बर्ट ऑन्डो ओस्सा यांना ३०.७७ टक्के मते मिळाली आहेत.
अशी गाजविली सत्ताअली बाँगो ओंडिंबा हे २००९ रोजी गॅबॉनचे राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांचे वडील उमर बाँगो यांनी गॅबनीज डेमोक्रॅटिक पार्टीची स्थापना केली होती. उमर हे १९६७ ते २००९ या कालावधीत गॅबॉनचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र अली बाँगो ओंडिंबा गॅबॉनचे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्या देशावर सुमारे ५३ वर्ष राज्य केले होते.