बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच आटोपल्या असून, या निवडणुकीत २००९ पासून सत्तेवर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना सलग चौथ्यांदा विजय मिळाला आहे. देशातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने शेख हसिना यांच्या अवामी लीग पक्षाला दोन तृतियांशहून अधिक जागांवर विजय मिळाला आहे. ३०० सदस्यसंख्या असलेल्या संसदेमध्ये हसिना यांच्या अवामी लीग पक्षाने २०४ जागा जिंकल्या आहे. गोपालगंज-३ येथून शेख हसिना ह्या २ लाख ४९ हजार ९६५ मतांनी विजयी झाल्या आहेत. तर त्यांच्या विरोधात लढणाऱ्या निजामुद्दीन लष्कर यांना केवळ ४६९ मतंच मिळाली. या निवडणुकीतील वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे बांगलादेशातील अल्पसंख्याक समुदाय असलेल्या हिंदूंनी शेख हसिना यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. तसेच अवामी लीगने हिंदू मतदारांच्या जोरावर १०७ जागा जिंकल्या आहेत. या मतदारसंघांमध्ये कमी मतदान झाल्याने हिंदू मतदारांची मतं निर्णायक ठरली.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खलिदा झिया यांचा पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीसह बांगलादेशला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची मागणी करणाऱ्या अनेक पक्षांनी या निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. त्यामुळे निवडणुकीत केवळ ४० टक्के एवढंच मतदान झालं होतं. हे मतदान मागच्या वेळी ८० टक्के मतदान झालं होतं. बांगलादेशमध्ये हिंदू मतदारांची टक्केवारी ही १० टक्के आहे. यातील बहुतांश मतदान हे अवामी लीग पक्षालाच झालं. त्यामुळे १०७ जागांवर शेख हसीना यांच्या उमेदवारांचा विजय निश्चित झाला.
जाणकारांनी सांगितले की, १०७ मधील अनेक जागा अशा होत्या जिथे हिंदू मतदारांची संख्या ही २० ते ४० टक्क्यांच्या आसपास आहे. काही हिंदूंनी सांगितलं की, देशामध्ये हिंदू लोकसंख्येवर ज्या प्रकारचा धोका दिसून येत आहे, त्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी समुदायातील लोकांनी शेख हसीना यांच्या पक्षाला मतदान केले. एकेकाळी बांगलादेशमध्ये हिंदू लोकसंख्येचं प्रमाण हे २२ टक्के होतं. मात्र ते घटून आता ८ टक्क्यांपर्यंत खाली आलं आहे. बांगलादेशमध्ये दर दहा वर्षांत एक टक्का हिंदू लोकसंख्या कमी होत आहे.