गेल्या काही काळापासून जगाच्या विविध भागातून खलिस्तानी फुटिरतावादी पुन्हा डोके वर काढत आहेत. दरम्यान, कॅनडामधील टोरँटो येथे भारतीय वंशाच्या नारगिकांनी खलिस्तानी फुटिरतावाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. येथील भारतीय वाणिज्य दूतावासासमोर खलिस्तानी फुटिरतावादी आंदोलन करण्यासाठी आले असताना भारतीय नागरिकांनी त्यांच्यासमोर तिरंगा फडकवून वंदे मातरम्, भारत माता की जय, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. गेल्या काही दिवसांपासून युनायटेड किंग्डम, अमेरिका आणि कॅनडा येथे भारतीय दूतावासांसमोर खलिस्तान्यांकडून आंदोलने सुरू आहेत. मात्र यावेळी भारतीय वंशांच्या नागरिकांनी या खलिस्तान्यांना चोख उत्तर दिले आहे.
याआधी ८ जुलै रोजी सुद्धा खलिस्तान समर्थकांनी लंडन, ऑस्ट्रेलिया, कॅनडासह काही देशांमध्ये भारताविरोधात रॅली काढली होती. त्या रॅलीला 'Kill india railly' असं नाव देण्यात आलं होतं. लंडनमध्ये या मोर्चाचं नेतृत्व हे खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पम्मा याने केलं. तो भारतातून फरार होऊन सध्या लंडनमध्ये मोकाटपणे फिरत आहे.
कॅनडामध्ये जेव्हा खलिस्तान समर्थक खलिस्तानी झेंडा घेऊन रॅली काढत होते तेव्हा त्यांच्यासमोर भारतीय समुदायाचे नागरिक उभे ठाकले. त्यांनी तिरंगा फडकवून खलिस्तान्यांना प्रत्युत्तर दिले. भारत माता की जय, हर हर महादेव आणि वंदे मारतरमच्या घोषणा त्यांनी दिल्या. यावेळी खलिस्तानी समर्थकही मोठ्या प्रमाणावर गोळा झालेले होते. त्यांनी भारतीय नेत्यांचे फोटो असलेले बॅनर लावले होते. तसेच हे नेते खलिस्तानी दहशतवादी हरदीप निज्जर याचे खुनी असल्याचा आरोप केला.