टोरांटो - कॅनडामध्ये दिवाळीच्या कार्यक्रमादरम्यान, खलिस्तान समर्थकांकडून भारतीय समुदायातील लोकांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मिसिसॉगामध्ये खलिस्तान समर्थक भारतीय समुदायाच्या लोकांना भिडले. त्यातून वादावादी झाली. दिवाळीनिमित्त होत असलेल्या पार्टीमध्ये खलिस्तान समर्थकांनी घुसखोरी केली. त्यानंतर त्यांनी भारतीय समुदायाच्या लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. खलिस्तान समर्थक आणि भारतीय समुदायातील लोकांमध्ये झालेल्या हाणामारीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये एकीकडे कही लोक तिरंगा फडकवताना दिसत आहेत. तर दुसरीकडे खलिस्तान समर्थकांकडून खलिस्तानचा झेंडा फडकवला जात असताना दिसत आहे.
मंदिरांवर हल्ले करणे आणि मंदिरांच्या भिंतींवर खलिस्तान समर्थनार्थ घोषणा लिहिणे अशी कृत्ये खलिस्तान समर्थकांकडून कॅनडामध्ये आधीही झाली आहेत. खलिस्तानला पाठिंबा देणारे आणि खलिस्तानी चळवळ चालवणारे अनेक नेते कॅनडामध्ये वास्तव्य करून आहेत. तसेच तिथून ते भारताविरोधातील कारवाया करत असतात. मिळत असलेल्या माहितीनुसार दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये कॅनडामध्ये खलिस्तान समर्थकांनी भारतीय समुदायातील लोकांवर हल्ला केला. त्यावेळी तिथे पोलीस उपस्थित होते. मात्र त्यांनी या दंगेखोरांना रोखले नाही. त्याऐवजी त्यांनी बघ्याची भूमिका घेतली.
कॅनडामधून खलिस्तान समर्थकांकडून भारताविरोधात होणाऱ्या कारवायांबरून भारत सरकारने कॅनडाच्या सरकारसमोर विरोध नोंदवलेला आहे. मात्र खलिस्तान समर्थक आणि खलिस्तानी चळवळीशी संबंधित असलेल्यांवर कुठलीही कारवाई झालेली नाही. दरम्यान, कॅनडामधील सरकारवर खलिस्तान समर्थकांचं लांगुलचालन करण्याचे आरोप सातत्याने होत असतात.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारत सरकारने हेट क्राईमबाबत एक अॅडव्हायजरी जारी केली होती. त्यामध्ये भारतीय समुदायातील लोकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला होता.