रमजान हा मुस्लिम धर्मियांचा पवित्र महिना मानला जातो. मात्र या महिन्यात उईगर मुस्लिमांना रोजा ठेवता येऊ नये, यासाठी चिनी पोलीस गुप्त हेरांची मदत घेत आहेत. रेडिओ फ्री एशियाने पूर्व शिनजियांग उइगर स्वायत्त भागातील एका पोलिस अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, गुप्त हेरांना चिनी अधिकारी ‘कान (ears)’, असे म्हणतात. ते सर्व सामान्य नागरीक, पोलीस आणि नेबरहुड कमेट्यांमधून घेतले जातात.
रेडिओ फ्री एशियासोबत बोलताना पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे की, 'आमच्या कडे मोठ्या प्रमाणावर सीक्रेट एजेन्ट आहेत.' माध्यमांतील वृत्तांनुसार, उइगर संस्कृती, भाषा आणि धर्माची गळचेपी करण्याच्या हेतूने चीनने 2017 मध्ये, शिनजियांग भागात रमजानमध्ये मुस्लिमांना रोजा ठेवण्यावर बंदी घालण्यास सुरुवात केली.
चिनी अधिकाऱ्यांनी लादलेल्या बंदीत 2021 आणि 2022 मध्ये काही प्रमाणावर सूट देण्यात आली. 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना रोजा ठेवण्याची परवानगी देण्यात आली. तसेच पोलिसांनी घरांची झडती आणि रस्त्यांवर गस्त घालणेही कमी केले.
यावर्षी पुन्हा कडक निर्बंध -रेडिओ फ्री एशियाने तुर्पण शहर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याचा हवाला देताना म्हटले आहे की, या वर्षी चीन सरकारने वय, लिंग अथवा पेशावर लक्ष न देता रोजा ठेवण्यावर बंदी घातली आहे. रमजानच्या पहिल्या आठवड्यात चिनी अधिकाऱ्यांनी 56 उइगर मुस्लिमांना आणि माजी कैद्यांना चौकशीसाठी बोलावले होते. तसेच, यानंतर त्यांनी दावा केला की, त्यांपैकी 54 जणांनी रोजा ठेवून कायद्याचे उल्लंघन केले. माध्यमांतील वृत्तांनुसार, कायद्याचे उल्लंघनकेलेल्या या लोकांसोबत नंतर काय घडले, यासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती मिळू शकलेली नाही.
प्रत्येक गावात दोन-तीन हेरांची नियुक्ती -याशिवाय, तुर्पणच्या पोलीस ठाण्यांनी प्रत्येक गावात दोन अथवा तीन गुप्तहेर नेमले असून ते रमजानच्या काळात उपवासासाठी ताब्यात घेतलेल्यांवर आणि तुरुंगातून सुटलेल्यांवर लक्ष ठेवतात. असेही रेडिओ फ्री एशियाने म्हटले आहे.