मलंग (इंडोनेशिया):इंडोनेशियातफुटबॉल सामन्यात झालेल्या हिंसाचार आणि चेंगराचेंगरीत १२५ जणांचा मृत्यू झाला आहे. पूर्व जावाच्या मलंग शहरात शनिवारी ही दुर्घटना घडली. फुटबॉलच्या मैदानाचे क्षणात रणांगणात रूपांतर झाले आणि अनेकांनी या मैदानावरच प्राण सोडले.
हा सामना अरेमा एफसी आणि पर्सेबाय सुराबाय या संघादरम्यान झाला. यात पर्सेबाय सुराबाय संघाने अरेमा एफसीवर ३-२ अशी मात केली. त्यानंतर पराभूत झालेल्या अरेमा एफसी संघाच्या समर्थक प्रेक्षकांनी मैदानावर येत गोंधळ सुरू केला. त्यांना हुसकाविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. एकच धावपळ सुरू झाली. लोक सैरावरा पळू लागले. अनेक जण तुडवले गेले, गुदमरले गेले. अनेक लोकांचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय पोलीस प्रमुख लिस्टयो सिगिट प्रबोवो म्हणाले की, काही मृतांची मोजणी दोनदा केली होती. मोजणी व्यवस्थित केल्यानंतर मृतांची संख्या १२५ असल्याचे स्पष्ट झाले. इंडोनेशियात २० मे ते ११ जून या काळात फिफा २०२३ वर्ल्ड कप स्पर्धा आहे.
पूर्व जावाचे पोलीस प्रमुख निको अफिन्टा यांनी सांगितले की, चाहत्यांनी पोलिसांवर हल्ला केला. वाहने जाळली, त्यामुळे आम्ही अश्रुधुराचा मारा केला. ३०० हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, अनेकांचा वाटेतच आणि उपचारादरम्यान मृत्यू झाला. १०० हून अधिक रुग्णांवर आठ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यातील ११ जणांची प्रकृती गंभीर आहे.
खेळाडू आणि पोलिसांनाही मारहाण
अरेमा एफसी आणि पर्सेबाय सुराबाय या संघादरम्यान हा सामना झाला. पर्सेबाय सुराबाय संघाने अरेमा एफसीवर मात केली. अरेमा एफसी संघाच्या हजारो समर्थक प्रेक्षकांनी मैदानावर येत गोंधळ सुरू केला. त्यांनी खेळाडू आणि अधिकाऱ्यांवर बाटल्या आणि इतर वस्तूंचा मारा सुरू केला. पाहता पाहता हा हिंसाचार स्टेडियमबाहेरही पसरला आणि पोलिसांची पाच वाहने पेटवून दिली.
जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, त्यामुळे एकच धावपळ सुरू झाली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पोलिसांनी लाठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी स्टँडमधील प्रेक्षकांवर थेट अश्रुधुराचा मारा सुरू केला. त्यामुळे प्रेक्षकांना बाहेरच्या दिशेने पळण्यास भाग पाडले. अश्रुधुरामुळे श्वास घेण्यास आणि दिसण्यास त्रास होऊ लागला. या गदारोळात अनेक जण खाली कोसळले आणि तुडवले गेले. यात दोन अधिकाऱ्यांसह ३४ जणांचा मृत्यू झाला.
फिफाच्या अध्यक्षांनी स्टेडियममधील दुर्घटनेला काळा दिवस व समजण्यापलीकडची शोकांतिका असल्याचे म्हटले आहे. तर, इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी सुरक्षा प्रक्रियेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
चेंगराचेंगरीच्या माेठ्या दुर्घटना
३० एप्रिल २०२१ इस्रायलमध्ये माउंट मेरोन उत्सवात चेंगराचेंगरीत ४५ लोकांचा मृत्यू
२४ सप्टेंबर २०१५ सौदी अरबमध्ये हजच्या दरम्यान चेंगराचेंगरीत २,४११ यात्रेकरूंचा मृत्यू
२७ जानेवारी २०१३ ब्राझीलमध्ये एका नाइट क्लबमध्ये आग लागून चेंगराचेंगरीत २०० लोकांचा मृत्यू
२२ नोव्हेंबर २०१० कंबोडियाची राजधानी नोमपेन्हमध्ये उत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत ३४० जणांचा मृत्यू
३० सप्टेंबर २००८ भारतात जोधपूरमध्ये एका मंदिरात चेंगराचेंगरीत १६८ लोकांचा मृत्यू
१२ जानेवारी २००६ मक्काजवळ हज यात्रेदरम्यान चेंगराचेंगरीत ३४५ लोकांचा मृत्यू
३१ ऑगस्ट २००५ इराकच्या बगदादमध्ये धार्मिक कार्यक्रमात पुलाचे कठडे कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६४० लोकांचा मृत्यू
२५ जानेवारी २००५ महाराष्ट्रात मांढरदेवी मंदिरात चेंगराचेंगरीत २६५ लोकांचा मृत्यू
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"