पाकिस्तानमध्ये पिठाचा तुटवडा असताना लोकांनी दुकानदारांवर पीठ जास्त किमतीत विकल्याचा आरोप केला आहे. पाक मीडियानुसार कराचीमध्ये १ किलो पिठासाठी १८० रुपये मोजावे लागतात. पाकिस्तान सरकारने दिलेले पीठ निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोपही जनतेने केला आहे.
खरे तर पाक सरकारने स्वस्त पिठासाठी तैनात केलेल्या ट्रकवर लोकांची झुंबड उडत आहे. पाकिस्तानमध्ये लोक रेशनच्या ट्रकच्या मागे बाईक्सवर मागे जात असल्याचेही दिसत आहे. यानंतरही अनेकांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. तसंच गाडीच्या मागे लोक धावतानाही दिसत आहेत. इतकंच नाही तर बंदुकीच्या सहाय्याने लोकांच्या गर्दीतून पिठाच्या पिशव्यांचं संरक्षण केलं जातंय.
पिठाच्या तस्करीचा आरोपपीठाचा मुद्दा पाकिस्तानच्या संसदेतही गाजत आहे. आमचं पीठ कोण चोरतंय? असा सवालही विरोधकांनी संसदेत केला. तसंच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पाकिस्तान सरकारवर पिठाची तस्करी केल्याचा आरोप केलाय. पाकिस्तानचे पीठ अफगाणिस्तानात तस्करी करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
खैबर पख्तूनख्वाचे सिनेटर मुश्ताक अहमद खान म्हणाले की, पिठाच्या किमती वाढल्याने लोक रस्त्यावर उतरले आहेत. पहिल्यांदाच लहान मुलांसह महिला पीठासाठी रस्त्यावर उतरत आहेत.
सरकारविरोधात संतापअनेक नागरिकांनी सरकारविरोधात नाराजी आणि संताप व्यक्त केला. लोकांनी पाकिस्तान सरकारवर अत्याचारी असल्याचा आरोप केला आहे. लोक सकाळी ६ वाजल्यापासून येथे पीठ घेण्यासाठी येतात. तेथे लहान मुले व महिला बसल्या आहेत. तक्रार कोणाकडे करायची, कुठे जायचे? आमची मुलं पीठासाठी रस्त्यावर बसली आहेत, असे एका स्थानिक व्यक्तीने सांगितले.