इंग्लंडच्या उत्तर पश्चिम भागात असलेल्या साऊथपोर्टमध्ये एका अज्ञाताने केलेल्या चाकूहल्ल्यामध्ये आठ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काही मुलांचाही समावेश आहे. साऊटपोर्ट भाग लिव्हरपूर शहराजवळ आहे. मर्सीसाइट पोलिसांनी या हल्ल्याबाबत माहिती देताना दुपारी या चाकूहल्ल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांच्या पथकाने शोधमोहीम हातात घेऊन संशयिताला ताब्यात घेतले. या संशयिताकडून एक चाकू जप्त करण्यात आला आहे. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोराने काही तरुणींना लक्ष्य केलं आहे. मात्र पोलिसांनी याबाबत अधिक सविस्तर माहिती दिलेली नाही.
पोलिसांनी हा एक मोठा हल्ला असल्याचे म्हटले आहे. तसेच यामध्ये काही लोकांचा मृत्यूही झाला असण्याची भीती व्यक्त केली आहे. पोलिसांनी भीतीचं वातावरण निर्माण करू नका, असं आवाहन केलं आहे. तसेच घटनास्थळाच्या आसपासच्या भागात जाणं टाळण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. दरम्यान, घटनास्थळाला पोलिसांनी घेराव घातला असून, ठिकठिकाणी सुरक्षा दलांना तैनात करण्यात आलं असल्याचं छायाचित्रांमधून दिसून येत आहेत.
दरम्यान, नॉर्थवेस्ट अँम्ब्युलन्स सर्व्हिसने एक मोठा हल्ला करण्याचा हल्लेखोराचा प्रयत्न होता, अशी माहिती दिली आहे. साऊथपोर्टच्या हार्ट स्ट्रीटवर आम्ही एका मोठ्या हल्ल्याचा सामना करत आहोत. इथे अनेक लोकांना चाकूहल्ला करून जखमी करण्यात आलं आहे. आम्ही आपातकालीन सेवेसोबत मिळून या घटनेचा सामना करत आहोत.
या घटनेबाबत स्थानिकांनी सांगितलं की, आम्ही पोलिसांनच्या गाड्यांच्या सायरनचा आवाजा ऐकला. त्यानंतर आकाशामधून हेलिकॉप्टरही उडताना पाहिली. तसेच दारे खिडक्या बंद ठेवा, असे मेसेज व्हॉट्सअॅप ग्रुपवर येत आल्याची माहितीही स्थानिकांनी दिली.