सुदानमध्ये यादवी माजली आहे. देशाचे संरक्षण करणारे सैन्य आणि देशातील सुरक्षेची जबाबदारी असलेले निम लष्करी दल यांच्यातच भीषण युद्ध सुरु झाले आहे. या हिंसक युद्धामुळे विचित्र परिस्थिती निर्माण झाली असून भारतीयांना घराबाहेर न पडण्याचे आदेश तेथील दुतावासाने दिले आहेत.
सुदानचे लष्कर आणि निम लष्करी दल एकमेकांच्या तळांवर हल्ले चढवत आहेत. यामुळे राजधानी खार्तूमसह देशभरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे भारतीयांना तेथील आश्रय केंद्रांमध्ये थांबण्यास सांगण्यात आले आहे. गोळीबार आणि चकमकीच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर, सर्व भारतीयांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कृपया शांत राहा आणि पुढील अपडेटची प्रतीक्षा करा, असे दुतावासाने म्हटले आहे.
निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्स (RSF) च्या नियमित सैन्याचे एकत्रीकरण करण्यावरून सुदानचे लष्करी नेते अब्देल फतेह अल-बुरहान आणि त्यांचा नंबर दोनचा निमलष्करी कमांडर मोहम्मद हमदान डगालो यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव होता. यातून दोन्ही दले थेट एकमेकांचे लष्करी तळ ताब्यात घेण्यासाठी एकमेकांवर हल्ले करू लागली आहेत.
यासाठी विमानतळ देखील ताब्यात घेण्यात आला आहे. लष्करी तळाजवळ स्फोट आणि गोळीबाराचे आवाज ऐकू येत आहेत. हे अचानक सुरु झाल्याने बेसावध असलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाण गाठण्यासाठी पळापळ करावी लागली, असे एफएपीने वृत्त दिले आहे.
2021 मध्ये जनरल अब्देल-फतेह बुरहान यांच्या नेतृत्वाखालील लष्करी बंडानंतरच सुदानमध्ये अराजकतेची स्थिती आहे. राष्ट्रपती भवनावर देखील ताबा घेतल्याचा दावा एका दलाने केला आहे. तसेच राष्ट्रपती भवनाचे सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत.