पॅरिस ( Marathi News ): मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रेंच अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर तीन दिवसांनी ३०० प्रवाशांना घेऊन एक विमान सोमवारी सायंकाळी मुंबई विमानतळाकडे रवाना झाले आहेत. यात बहुतांश प्रवासी भारतीय आहेत.
रोमानियाच्या लीजेंड एअरलाइन्सद्वारे चालवले जाणारे ए ३४० विमान सकाळी मुंबई विमानतळावर उतरेल. यूएईमधील दुबईहून ३०३ प्रवाशांना घेऊन निकारागुआला जाणारे विमान गुरुवारी ‘मानवी तस्करी’च्या संशयावरून पॅरिसच्या १५० कि.मी. पूर्वेकडील वॅट्री विमानतळावर थांबविण्यात आले होते. या प्रकरणी रविवारी चार फ्रेंच न्यायाधीशांनी ताब्यात घेतलेल्या प्रवाशांची चौकशी केली. या प्रवाशांमध्ये काही प्रवासी हिंदी, तर काही तामिळ भाषिक होते.
दोन प्रवाशी ताब्यात
विमानात ११ अल्पवयीन मुले असून त्यांच्यासोबत कोणीही नव्हते. शुक्रवारी ताब्यात घेतलेल्या दोन प्रवाशांची ताब्यात घेण्याची मुदत शनिवारी संध्याकाळी ४८ तासांनी वाढवण्यात आली, असे फ्रेंच वकिलांनी सांगितले.
परत यायचे नव्हते...
विमानातील अनेक प्रवासी भारतात पुन्हा परतण्यास तयार नव्हते. त्यामुळे दुपारी १ वाजता निघणारे विमान सायंकाळी ७नंतर भारताकडे रवाना झाले.