वॉशिंग्टन :
अमेरिकेत सत्तारूढ डेमोक्रॅटिक पार्टीचे पाच भारतीय- अमेरिकन नेते प्रतिनिधी सभेत निवडून आले आहेत. विजयी झालेल्या नेत्यांमध्ये भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना आणि प्रमिला जयपाल यांचा समावेश आहे.
भारतीय-अमेरिकी उद्योजक श्री ठाणेदार (६७) हे रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार मार्टेल बिविंग्स यांचा पराभव करून मिशिगनमधून संसदेची निवडणूक जिंकणारे पहिले भारतीय-अमेरिकी ठरले आहेत. सिलिकॉन व्हॅलीतील रो खन्ना (४६) यांनी कॅलिफोर्नियातून रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार रितेश टंडन यांचा पराभव केला. प्रतिनिधी सभेतील एकमेव भारतीय-अमेरिकी महिला संसद सदस्य प्रमिला जयपाला यांनी वॉशिंग्टन प्रांतातून प्रतिस्पर्धी क्लिफ मून यांचा पराभव केला. खन्ना, कृष्णमूर्ती आणि जयपाल हे सलग चौथ्यांदा निवडणूक लढवत होते.
अरुणा मिलर यांनी इतिहास रचला भारतीय-अमेरिकी अरुणा मिलर यांनी मॅरिलँडमध्ये लेफ्टनंट गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत विजयी होत इतिहास रचला. मिलर यांनी डेमोक्रॅटिक पार्टीच्या तिकिटावर लेफ्टनंट गव्हर्नरपदासाठी निवडणूक लढली.