रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचे ढग जसजसे गडद होऊ लागले तसतसे या दोन्ही देशांत असलेले जगभरातील विद्यार्थी आणि नागरिक मायदेशी परतीचे रस्ते शोधू लागले. यातले काही भाग्यवान परत आपापल्या देशात परतले. जे त्यांच्याहीपेक्षा जास्त सुदैवी होते, ते आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांनाही आपल्यासोबत आणू शकले. तरी अजूनही हजारो नागरिक युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. यात आणखी एक भारतीय नाव आहे ते म्हणजे डॉ. गिरीकुमार पाटील. ते मूळचे आंध्र प्रदेशचे; पण गेल्या १५ वर्षांपासून ते युक्रेनमध्येच राहत आहेत. गिरीकुमार पाटील हे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी म्हणून १५ वर्षांपूर्वी युक्रेनला गेले, तिथेच त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि आजही ते तिथेच वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. युद्धाच्या ज्वाळांनी युक्रेन बेचिराख होत असताना आणि जमेल तेवढ्या नागरिकांनी देशातून पळ काढला असताना डॉ. गिरीकुमार यांना मात्र युक्रेनमधून हलायचं नाहीये. ते तिथेच तळ ठोकून आहेत. त्यांना स्वत:ला तर युक्रेनमधून बाहेर पडायचं नाहीये; पण इतर अनेक भारतीयांना युक्रेनमधून बाहेर पडता यावं, यासाठी मात्र ते जीवापाड मेहनत घेत आहेत.
डॉ. गिरीकुमार पाटील म्हणतात, ‘माझा जीव गेला तरी बेहत्तर; पण मी युक्रेन सोडणार नाही. इतक्या वर्षांत युक्रेनचा त्यांना लळा लागला आहे, हे तर खरंच; पण त्याहीपेक्षा मुख्य कारण आहे, ते म्हणजे त्यांनी चक्क दोन खतरनाक जंगली जनावरं पाळली आहेत. त्यातला एक आहे ब्लॅक पँथर आणि दुसरा आहे जग्वार ! (हे दोन्हीही प्राणी बिबट्या कुळातले आहेत.) युक्रेनमधील कीव्ह प्राणी संग्रहालयातून ही दोन्ही शाही जनावरं त्यांनी विकत घेतली आहेत. त्यासाठी भलीमोठी किंमतही त्यांनी मोजली आहे. सुमारे वीस महिन्यांपूर्वी तब्बल ३५ हजार डॉलर्सला (सुमारे २७ लाख रुपये) त्यांनी ही जोडी खरेदी केली. घरच्या माणसांइतकंच या दोघांवर त्यांचं प्रेम आहे. म्हणून त्यांना सोडून डॉ. गिरीकुमार यांना कुठेही जायचं नाही. पूर्व युक्रेनमधील डाेन्बास भागातील सोवेरोडोनेस्क येथे सध्या या प्राण्यांसोबत ते एका बंकरमध्ये राहत आहेत. यातील जग्वार हा वीस महिन्यांचा नर आहे, तर ब्लॅक पँथर ही सहा महिन्यांची मादी आहे. डॉ. गिरीकुमार यांच्याकडचा जग्वार जगातल्या सर्वाधिक दुर्मीळ प्रजातीतला एक आहे. अशा प्रकारचे जगात आता केवळ पंधरा ते वीस जग्वार उरले आहेत, असं डॉ. गिरी यांचं म्हणणं आहे. नर लेपर्ड आणि मादी जग्वार अशा हायब्रीड संकरातून त्यांच्याकडचा जग्वार जन्माला आलेला आहे.४० वर्षीय डॉ. गिरीकुमार यांनी अजून लग्न केलेलं नाही. डॉ. गिरीकुमार सांगतात, युद्ध सुरू झाल्यापासून माझ्या घरचे मला परत भारतात बोलवताहेत; पण माझ्या या ‘मुलांना’ एकटं सोडून मी कसं काय परत जाऊ? मी जर त्यांना सोडून गेलो, तर खात्रीनं ते मरतील. आता जे काय व्हायचं ते आम्हा सर्वांसोबतच होईल.. डॉ. गिरीकुमार आणि त्यांच्या या ‘दोन्ही मुलांच्या फॅमिली’नं सध्या दिवसरात्र एका तळघरात आपल्याला डांबून घेतलं आहे. अनेक संकटांना त्यांना तोंड द्यावं लागत आहे. अन्न नाही, पाणी नाही, सतत गोळीबार आणि बॉम्बस्फोटांचे धमाके.. डॉ. गिरीकुमार बंकरमधून बाहेर पडतात, ते केवळ त्यांच्या या प्राण्यांना अन्न आणण्यासाठी म्हणूनच. जीवावर उदार होत शेजारच्या खेड्यात जाऊन त्यांनी या दोघा प्राण्यांसाठी नुकतीच २३ किलोची एक मेंढी आणि काही मांस विकत आणलं; तेही नेहमीच्या दरापेक्षा तब्बल चार पट किंमत मोजून! या दोन्ही शाही प्राण्यांशिवाय तीन कुत्रेही त्यांच्याकडे आहेत. आपल्या मिळकतीचा जवळपास सर्व हिस्सा ते या प्राण्यांवरच खर्च करतात. आपल्या यू ट्यूब चॅनलवर या प्राण्यांचे व्हिडिओ ते कायम शेअर करीत असतात. या चॅनलचे जवळपास लाखभर सदस्य आहेत. लोकांना आवाहन करून त्या माध्यमातूनही निधी गोळा करण्याचा प्रयत्न ते आता करताहेत.
युक्रेनमध्ये आल्यापासून डॉ. गिरीकुमार दुसऱ्यांदा युद्धाला सामोरे जाताहेत. यापूर्वीही रशियानं युक्रेनवर २०१४ मध्ये हल्ला केला होता. त्यावेळी ते लुहान्सक येथे राहत होते. रशियाच्या हल्ल्यात त्यांचं राहतं घर तर बेचिराख झालंच; पण त्यांनी तिथे जे इंडियन रेस्टॉरंट सुरू केलं होतं, तेही उद्ध्वस्त झालं. त्यानंतर त्यांनी सोवेरोडोनेस्क येथे आसरा घेतला. सध्याची ही जागा रशियन सीमेपासून केवळ शंभर किलोमीटर अंतरावर आहे..
चित्रपटांतही केलंय काम !दक्षिण भारतीय अभिनेता चिरंजिवी हा डॉ. गिरीकुमार यांचा आवडता हिरो. एका चित्रपटामध्ये चिरंजिवीला बिबट्यांसोबत पाहिल्यानं आपणही असे राजबिंडे प्राणी पाळावेत, असं त्यांना वाटायला लागलं. चार तेलुगू चित्रपटांमध्ये त्यांनी छोट्या भूमिका केल्या आहेत; पण हे चित्रपट प्रदर्शितच झाले नाहीत. याशिवाय तमिळ, तेलुगू आणि मल्याळम टीव्ही मालिकांतही ते अधूनमधून दिसले आहेत. एवढंच नाही, युक्रेनमधील काही चित्रपटांतही ‘परदेशी’ पाहुण्या कलाकाराची भूमिका त्यांनी वठवली आहे.