कीव्ह : अमेरिका आपल्याला पुरेशी मदत करत असल्याचे युक्रेनवासीयांना वाटावे असा एकही शब्द जो बायडेन यांनी उच्चारला नाही, अशी टीका युक्रेनच्या एक खासदार इन्ना सोवसन यांनी केली आहे.
युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नुकताच युरोपचा दौरा केला. ते युक्रेनचा शेजारी देश पोलंडमध्येही जाऊन आले. तिथे त्यांनी सांगितले की, सुरक्षेच्या कारणामुळे मला युक्रेनमध्ये जाता आले नाही याचे दु:ख होते. नाटो देशांच्या एक इंच जमिनीवरही कुणी आक्रमण केले तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. इन्ना सोवसन म्हणाल्या की, आम्ही तुमच्यासोबत आहोत असे बायडेन म्हणाले असले तरी त्यामुळे युक्रेनचे समाधान झालेले नाही. पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला सध्या मिळणारी मदत तुटपुंजी आहे. बायडेन यांनी पोलंडला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, बॉम्बहल्ले पोलंडच्या वॉर्सा शहरात नव्हे, तर युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये होत आहेत.