लंडन : आवश्यक उपचार केल्यानंतरही कर्करोग पुन्हा बळावतो, असे अनेक रुग्णांत आढळून आले आहे. आता रक्तचाचणीतून कर्करोग पुन्हा बळावत आहे का, याचा वेळीच छडा लावून रुग्णाला वाचविणे शक्य होईल. तथापि, ही रक्तचाचणी इस्पितळात उपलब्ध होण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.लंडनस्थित इन्स्टिट्यूट आॅफ कॅन्सर रिसर्च या संस्थेच्या वैज्ञानिकांनी या दिशेने संशोधन हाती घेतले आहे. गाठ काढून टाकणे, हा कर्करोगावरील जालीम इलाज असल्याचे मानले जाते. तथापि, ही गाठ एका पेशीपासून सुरू होते. ही गाठ शरीराच्या इतर भागापर्यंत पोहोचल्यास किंवा शस्त्रक्रिया करून ही गाठ काढली गेली नाही, तर कर्करोग पुन्हा बळावू शकतो. उपचारानंतरही कर्करोग बळावला आहे का, हे पाहण्यासाठी वैज्ञानिकांनी या गाठीच्या डीएनएचे विश्लेषण केल्यानंतर डीएनएतील बदलाची मुळे रक्तात आढळतात का? याबाबत संशोधन केले. १५ महिलांची रक्तचाचणी केली असता त्यापैकी १२ महिलांत पुन्हा कर्करोग बळावत असल्याचे निदान वेळेआधीच करता आले. (वृत्तसंस्था)