ऑनलाइन लोकमत
पॅरीस, दि. २१ - पॅरीसच्या हल्ल्यानंतर फ्रान्समधल्या मुस्लीमांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलत असून अनेकांना द्वेषाचा सामना करायला लागत आहे. पॅरीसमध्ये राहणा-या सामिया माहफोदिया महिलेच्या सांगण्यानुसार मेट्रोने प्रवास करताना तिच्याकडे बघताना लोकांच्या नजरेतले भाव तिरस्काराचे असल्याचे जाणवत आहे.
अहमद मिओझी या गेली ४२ वर्षे फ्रानस्मध्ये राहणा-या पण मूळच्या मोरोक्कोतल्या व्यक्तिच्या सांगण्यानुसार इथले लोक आता मुस्लीमांकडे काय त्रास या नजरेने बघत असल्याचे अनुभवाला येत आहे. फ्रान्समधल्या मुस्लीमांसाठी आता खडतर काळ असल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे.
शुक्रवारच्या पॅरीसमधल्या ग्रँड मशिदीतल्या नमाजसाठी ज्यावेळी मुस्लीम आले त्यावेळी पोलीसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला होता, मुस्लीमांची मेटल डिटेक्टर्सनी तपासणी केली जात होती.
काही मुस्लीमांनी दहशतवादी इस्लाममध्ये आणि त्यांच्या इस्लाममध्ये फरक असल्याचे सांगत बिगर मुस्लीमांना हे समजावून सांगायला हवं ही भावना व्यक्त केली आहे. बिगर मुस्लीम हे सगळ्या मुस्लीमांना इस्लामिक स्टेटशीच जोडतात याबद्दल अनेकांनी वैष्यम्य व्यक्त केले आहे. पॅरीसच्या हल्ल्यानंतर काही मुस्लीमांवर हल्ले झाल्याचेही सांगण्यात येत असून रस्त्यावर उतरण्याची भीती वाटत असल्याचे सोरया मोमेन या २० वर्षीय मुलीने म्हटले आहे. सगळे मुस्लीम हे दहशतवादी नाहीत हे फ्रान्समधल्या लोकांनी समजून घ्यावं असं तिनंही म्हटलं आहे.
बुरख्यातल्या महिलांवर हल्ले करण्याचे प्रमाणही वाढले असून एका प्रसंगात ज्यू शिक्षकालाही लक्ष्य करण्यात आल्याची घटना घडली आहे. पॅरीस वगळता फ्रान्सच्या अन्य भागांमध्येही मुस्लीमांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्याचे वृत्त आहे.