ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - जगभरातील शांतताप्रिय देशांमध्ये भारताची घसरण सुरु असून २०१० मध्ये १२५ व्या स्थानावर असलेला भारत २०१४ मध्ये १४३व्या क्रमांकावर पोहोचला आहे. धक्कादायक बाब म्हणजे श्रीलंका, नेपाळ या शेजारी राष्ट्रांपेक्षाही भारतातील अशांतता वाढत असल्याचे समोर आले आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेतर्फे दरवर्षी ग्लोबल पीस इंडेक्स हा अहवाल प्रकाशित करण्यात येतो. यंदा अहवालात जगातील १६२ देशांचा समावेश करण्यात आला असून या देशांमध्ये जगातील ९० टक्क्याहून अधिक लोकं राहतात. देशांतर्गत वाद, आंतरराष्ट्रीय वाद, सैन्यबळाचा वापर, तुरुंगातील कैद्यांची संख्या, समाजातील सुरक्षा आणि संरक्षण, दहशतवादी कारवाया अशा विविध मुद्द्यांच्या आधारे हा अहवाल तयार केला जातो. या अहवालात १६२ देशांमध्ये भारताचा १४३ क्रमांक लागला आहे. तर भारताचा शेजारी पाकचा १५४, श्रीलंकेचा १०५ आणि नेपाळचा ७८ वा क्रमांक लागला आहे.
२००८ पेक्षा यंदा जगातील ११ देशांमधील अशांततेचे प्रमाण कमी झाले आहे. तर ५१ देशांमधील प्रमाण दरवर्षी वाढत आहे. आइसलँड हा जगातील सर्वात शांत देश आहे. त्याखालोखाल डेन्मार्क, न्यूझीलंड या देशांचा नंबर लागतो. जॉर्जिया, लिबीया, आयव्हरी कोस्ट या देशांमध्ये शांतता निर्माण करण्याचे जोमाने प्रयत्न सुरु आहेत. तर सिरीया यंदा सर्वाधिक अशांत देश बनले आहे. सिरीयाचा या यादीत सर्वात तळाचा म्हणजे १६२ वा क्रमांक लागला आहे. तर अफगाणिस्तानचा १६१ वा क्रमांक आहे.