यंदाचा १५ ऑगस्ट म्हणजे भारताचा ७५वा स्वातंत्र्यदिन. याचा अर्थ आजपासून भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू झालेला आहे. केवळ भारतातल्या कोट्यावधी जनतेनेच नव्हे तर जगभर पसरलेल्या लाखो भारतीय लोकांनी या अमृतमहोत्सवाची सुरूवात एकत्र येऊन साजरी केली.
हा सोहळा वॉशिंग्टन डीसीच्या मराठी कला मंडळाने दिमाखात साजरा केला. कोव्हिड १९ मुळे समस्त मराठी जनतेला एका ठिकाणी जमवणे सध्या शक्य नसल्याने, वॉशिंग्टनच्या मराठी जनतेचे प्रतिनिधी म्हणून मंडळाचे कार्यकारी समितीचे लोक एकत्र आले. संपूर्ण सोहळ्याचे झूमद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या काही दिवस आधी, कार्यक्रमाची कल्पना देणारा उत्तम दर्ज्याचा टीझर कार्यकारी समितीच्या सदस्यांनी निर्माण केला आणि इमेल आणि वेबसाईटद्वारे वॉशिंग्टनच्या मराठी जनतेला पाठवण्यात आला. कार्यकारी समितीने भारतीय स्वातंत्र्यदिनाला साजेशी सजावट केली. आपल्या मायभूमीला वंदन करण्याकरता योग्य ती वेषभूषा लेवून समस्त कार्यकारी सदस्य एकत्र आले.
मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री. श्रीरंग पांडे यांच्या हस्ते अमेरिकन आणि भारतीय झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले. दोन्ही देशांची राष्ट्रगीतं वाजवली गेली. भारतीय राष्ट्रगीताच्या वेळी समस्त उपस्थित कार्यकारी सदस्यांनी राष्ट्रगीताच्या संगीताबरोबर त्याचे गायन करून ध्वजवंदन केले. "भारतमाता की जय" या घोषणांनी परिसर दुमदुमला. विद्यमान उपाध्यक्षा पद्मिनी माहुरकर यांनी आपल्या सुंदर घराच्या बागेमधे हा सोहळा घडवून आणला. ध्वजारोहणाच्या सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणानंतर मंडळातल्या गुणी सदस्यांच्या देशभक्तीपर गीतांच्या गाण्यांचे प्रक्षेपण करण्यात आले. गायनवादन आणि त्याचबरोबर व्हिडिओ-साऊंड संकलनावर विशेष मेहनत घेऊन उत्तम दर्ज्याची हिंदी आणि मराठी गाणी सादर करण्यात आली. यानंतर कथ्थकगुरु पंडिता मनीषा साठे यांनी, वॉशिंग्टन डीसीकरता पुण्याहून खास सादर केलेला कथ्थकचा कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात आला.
झूम आणि युट्युबद्वारे शेकडो वॉशिंग्टनकर मराठी वासीयांनी या सोहळ्याचा लाभ घेतला आणि भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवामधे भाग घेतला.