Independence Day 2021: भारताचा आज ७५ वा स्वातंत्र्य दिन असून संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिनाचं सेलिब्रेशन केलं जात आहे. देशाच्या स्वातंत्र्य दिनाबाबत संपूर्ण जगभरातून भारताला शुभेच्छा दिल्या जात आहेत. यात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनीही भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या आंतरराष्ट्रीय संबंधांची प्रशंसा केली आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताच्या सामर्थ्यालाही सलाम केला आहे.
"आर्थिक, सामाजिक आणि इतर क्षेत्रांमध्ये भारताने प्राप्त केलेल्या यशाला व्यापक स्तरावर स्वीकारलं जातं. भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप मोठी प्रतिष्ठा आहे आणि जागतिक पातळीवरील मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी भारताची मोलाची भूमिका असते", असं व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं आहे.
पुतीन यांनी यूएनएससीमध्येही केली होती भारताची प्रशंसारशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी नुकतंच यूएनएससी म्हणजेच संयुक्त राष्ट्र परिषदेच्या बैठकीत भारताचं कौतुक केलं होतं. ''मी माझ्या भारतीय मित्रांना धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांनी या महिन्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षतेच्या कार्याला यशस्वीरित्या पूर्ण करणं सुरू ठेवावं", असं पुतीन म्हणाले होते.
अमेरिकेनंही दिल्या शुभेच्छाभारताच्या स्वातंत्र्य दिनाबाबत जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेनंही शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारताला शुभेच्छा दिल्या. "भारत आणि अमेरिकेनं संपूर्ण जगाला दाखवून द्यायला हवं की दोन महान व लोकशाही असलेले देश लोकांसाठी जबरदस्त काम करू शकतात", असं बायडन यांनी म्हटलं आहे. यासोबतच भारत, अमेरिका आणि संपूर्ण जगात स्वातंत्र्याचा जल्लोष करणाऱ्या सर्व भारतीयांच्या सुरक्षा व समृद्धीसाठी मी प्रार्थना करतो, असंही बायडन यांनी म्हटलं आहे.