नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात लडाख सीमेवर वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी चीनला इशारा दिला आहे. चीनने हे लक्षात ठेवावे की, आता २०२० आहे १९६२ नाही. आज भारताचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या धाडसी नेतृत्वाकडे आहे. भारताकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांना उरी आणि बालकोटमध्ये काय अवस्था झाली ती पाहावी असे त्यांनी सांगितले.
रविशंकर प्रसाद हिमाचल प्रदेशात जनसंवाद व्हर्चुअल रॅलीला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले की, भारत शांततापूर्ण मार्गाने वादावर तोडगा काढेल. पण आज कोणीही भारताकडे डोळे वटारून पाहू शकत नाही. आज २०२० चा भारत आहे, १९६२ चा नाही, भारताचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात आहे, काँग्रेस नेत्यांच्या हातात नाही, असा टोला त्यानी काँग्रेसला लगावला. भारताला १९६२ च्या लढाईत चीनकडून हार पत्करावी लागली होती. चीनच्या सरकारी वृत्तपत्राने लडाखमध्ये सुरु असलेल्या भारत चीन यांच्या सैन्यातील तणावावर भारताला १९६२ च्या युद्धाची आठवण करुन दिली. दोन्ही देशाच्या पातळीवर लाइन आॅफ एक्चुअल कंट्रोलवर तणाव कमी करण्यासाठी सैन्यस्तरीय चर्चा सुरु आहे. ६ जून रोजी लेफ्टनंट जनरल पातळीवर चीनची आक्रमकता कमी झाली पण ते जुन्या स्थितीत परतण्याच्या मानसिकतेत नाही. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सरकारला चीन सीमेवर स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते.