ऑनलाइन लोकमत
दावोस, दि. 16 - भारतामधली 58 टक्के संपत्ती अवघ्या 1 टक्का श्रीमंतांच्या खिशामध्ये एकवटली असून आर्थिक विषमता वाढीचे हे द्योतक आहे. एका अभ्यासामध्ये असेही दिसून आले आहे, की जगामधली 50 टक्के संपत्ती 1 टक्का धनिकांच्या हाती एकवटली आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीआधी ऑक्सफॅमने प्रसिद्ध केलेल्या या अहवालात नमूद केले आहे की, भारतामध्ये 57 अब्जाधीशांच्या हातात 216 अब्ज डॉलर एवढी संपत्ती असून ही 70 टक्के लोकसंख्येच्या संपत्तीएवढी आहे.
मुकेश अंबानी (9.3 अब्ज डॉलर्स), दिलीप संघवी (16.7 अब्ज डॉलर्स) आणि अझीम प्रेमजी 915 अब्ज डॉलर्स) हे भारतातल्या अब्जाधीशांमध्ये आघाडीवर आहेत. भारतामधली एकूण संपत्ती 3.1 लाख कोटी डॉलर्स असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर एकूण जागतिक संपत्ती 255.7 लाख कोटी डॉलर्स असल्याचे म्हटले आहे. यामध्ये बिल गेट्स (75 अब्ज डॉलर्स), अमान्सिओ ओर्तेगा (67 अब्ज डॉलर्स) व वॉरेन बफे (60.8 अब्ज डॉलर्स) यांचा समावेश आहे.
इकॉनॉमी फॉर 99 परसेंट असं नाव असलेल्या या अहवालात प्रत्येकाला लाभ होईल अशी अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे आव्हान असल्याचे म्हटले आहे. 2015 नंतर आर्थिक विषमता वाढली असून जगामध्ये 1 टक्का लोकांच्या हातात अन्य 99 टक्के लोकांपेक्षा जास्त संपत्ती असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
भारत, चीन, इंडोनेशिया, लाओस, बांग्लादेश व श्रीलंका या देशातल्या 10 टक्के श्रीमंतांच्या संपत्तीचा हिस्सा गेल्या दोन दशकांमध्ये 15 टक्क्यांनी वाढला आहे. तर याच कालावधीत या देशांमधल्या गरीबांच्या संपत्तीचा हिस्सा 15 टक्क्यांनी कमी झाला आहे.