India-Afghanistan : भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध हळुहलू सुधारत आहेत. याचा प्रयत्याय काल, म्हणजेच 6 नोव्हेंबर 2024 रोजी पाहायला मिळाला. अफगाणिस्तानमध्येतालिबानचे सरकार स्थापन झाल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव जेपी सिंग यांनी बुधवारी काबूलमध्ये तालिबानी संरक्षण मंत्री मोहम्मद याकूब मुजाहिद यांच्याशी पहिल्यांदाच भेट घेतली. याकूब हा तालिबानचा माजी सर्वोच्च नेता अमीर मुल्ला उमर याचा मुलगा आहे. तर, जेपी सिंग हे परराष्ट्र मंत्रालयात अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इराण प्रकरणांचे प्रभारी आहेत.
ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध गोठले होते, पण आता भारताला अफगाणिस्तानशी संबंध पुढे नेण्याची इच्छा आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय अधिकाऱ्याने तालिबानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी आणि अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करझाई यांचीही भेट घेतली आहे. विशेष म्हणजे, जेपी सिंग यांचा वर्षभरातील हा दुसरा काबूल दौरा आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सूचनेनुसार परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे एक शिष्टमंडळही त्यांच्यासोबत गेले आहे.
तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, "या बैठकीत दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय संबंध वाढवण्यावर भर दिला आहे. विशेषत: मानवतावादी सहकार्य आणि इतर मुद्द्यांवर अफगाणिस्तान आणि भारताने संवाद सुरू ठेवण्याची आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे." मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगान सरकारने त्यांचा भूभाग भारताविरोधात दहशतवादी कारवायांसाठी वापरू देणार नसल्याचे मान्य केले आहे.
दरम्यान, अफगाणी संरक्षमंत्री याकूबने याआधीही भारतासोबत मजबूत संबंधांची आशा व्यक्त केली आहे. नवी दिल्लीतील अफगाण दूतावासात तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी करत आहे. परंतू भारताने अद्याप तालिबान प्रशासनाला औपचारिक मान्यता दिलेली नाही. मध्य आशियातील आपला पोहोच मजबूत करण्यासाठी भारत अफगाणिस्तानकडे एक महत्त्वाचा भागीदार म्हणून पाहत आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमुळे याची शक्यता बळावली आहे.