ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - अॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाइटने पुन्हा एकदा भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अॅमेझॉनच्या वेबसाइटवर विक्रीसाठी असलेल्या स्टिकरमध्ये भारताचा काही हिस्सा पाकिस्तान आणि चीनमध्ये असल्याचं दाखवण्यात आला आहे.
शिवाय, भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीरचा भाग वगळल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे अॅमेझॉन पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडले आहे. दिल्लीतील भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी सोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून या सर्व प्रकाराबाबत टीका करत अॅमेझॉनविरोधात हल्लाबोल चढवला आहे.
भारतीय राष्ट्रध्वज व नकाशाबाबतची चुकीची माहिती पसवणा-या अॅमेझॉनने तातडीने सर्व उत्पादने वेबसाइटवरुन काढून टाकावीत, अशी मागणी बग्गा यांनी केली आहे. वेबसाइटवर उपलब्ध असलेले वॉल डेकोरेशन स्टिकरवर भारताचा चुकीचा नकाशा दाखवण्यात आला आहे, याविरधोत बग्गा यांनी आवाज उठवला आहे.
उत्पादनं हटवण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी
बग्गा यांनी आतापर्यंत या प्रकरणी कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही. मात्र, जर दोन दिवसांच्या आता भारताचा चुकीचा नकाशा असलेले स्टिकर हटवण्यात आले नाही तर तक्रार नोंदवणार असल्याचा इशारा बग्गा यांनी दिला आहे.
यापूर्वी अॅमेझॉन कॅनडाच्या वेबसाइटवर भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगासारखी पायपुसण्यांची विक्री होत असल्याची तक्रार एका भारतीय नागरिकाने केली होती. यावेळी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या कडक इशा-यानंतर अॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाइटने स्वराज यांना पत्र लिहून माफी मागितली होती. कॅनडा येथील अॅमेझॉनच्या वेबसाइटवर भारताच्या राष्ट्रध्वजासारखी पायपुसणी विक्रीला ठेवण्यात आली होती.
"भारतीयांच्या भावनांचा आम्ही आदर करतो, त्यांच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. त्या पायपुसण्या थर्ड पार्टीकडून विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या", असे पत्र अॅमेझॉनकडून सुषमा स्वराज यांना पाठवण्यात आले होते.
एका भारतीय नागरिकाने निदर्शनास आणून दिल्यानंतर याची दखल घेत स्वराज यांनी त्या पायपुसण्यांची विक्री त्वरित थांबवण्यास आणि बिनशर्त माफी मागण्यास सांगितले होते. यानंतर अॅमेझॉननं त्वरित वेबसाइटवरील तिरंग्याचा अपमान करणारी पायपुसणी हटवली.