संयुक्त राष्ट्रे : माहिती व संपर्क तंत्रज्ञान सेवा निर्यातीत भारत सर्वात मोठा देश म्हणून पुढे आला असल्याचे मत संयुक्त राष्ट्राने व्यक्त केले आहे. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या (डब्ल्यूआयपीओ) दहाव्या आवृत्तीत ही माहिती देण्यात आली आहे.भारत हा आशियातील उदयोन्मुख नावीन्यपूर्ण केंद्र असल्याचे मत यात व्यक्त करण्यात आले आहे. तथापि, राजकीय स्थिरता आणि सुरक्षितता यात भारत १०६व्या क्रमांकावर आहे. जगातील उदयोन्मुख १३० देशात भारताचे स्थान ६०वे आहे. मध्य व दक्षिण आशियात भारत प्रथम क्रमांकावर आहे. गतवर्षीच्या ६६व्या स्थानावरून भारत यंदा ६०व्या स्थानावर आला आहे. भारत, केनिया, व्हिएतनामसह अन्य काही देशांनी आपल्या समकक्ष देशांपेक्षा या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीच्यामते नव्या उत्पादनांच्या संदर्भात जागतिक परिवर्तनात समृद्ध देशांचे वर्चस्व कायम आहे. सलग सातव्या वर्षी स्वित्झर्लंड अव्वल स्थानावर आहे. भारताने अनेक बाबतीत चांगला ठसा उमटविला आहे. माहिती व संपर्क सेवा निर्यातीत भारत अग्रेसर आहे. विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या पदवीधरांच्या बाबतीत भारत १०व्या स्थानावर आहे.ई-भागीदारीबाबत २७व्या स्थानावर तर जागतिक संशोधन आणि कंपन्यांच्या विकासाबाबत भारत १४व्या स्थानावर, सरकारी आॅनलाइन सेवांच्या बाबतीत ३३व्या क्रमांकावर आहे. पायाभूत विकासाच्या बाबतीत ३२वे स्थान आणि सर्जनशील वस्तंूच्या निर्यातीत १८व्या स्थानावर आहे. बौद्धिक संपदेच्या बाबतीत २९वे स्थान, तर नावीन्यपूर्ण गुणवत्तेत सलग दुसऱ्या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर आहे. (वृत्तसंस्था)
माहिती, संपर्क तंत्रज्ञान निर्यातीत भारत अग्रेसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2017 12:18 AM